मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मते सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहाय्यकाची (क्लिनर) शक्यतो गरज पडत नाही. त्यामुळे त्याचा विनाकारण खर्च वाढतो. तो खर्च कमी करण्यासाठी चालकासह सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 96 (2) (xxxii) अन्वये शासनाला दिलेल्या अधिकारांनुसार या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, 29 ऑगस्ट 2025 नंतर शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या मसुद्यावर कोणत्याही व्यक्तीने हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, 5 वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. 2, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाच्या विचारार्थ घेतल्या जातील.
मसुदा नियम
हे नियम महाराष्ट्र मोटार वाहन (प्रथम सुधारणा) नियम, 2025 म्हणून ओळखले जातील.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 249 मध्ये खालील तरतूद जोडण्यात येईल:
कशी असेल वाहन प्रणाली?
जड मालवाहतूक वाहनामध्ये (Heavy Goods Vehicle) सहाय्यक (attendant) असणे बंधनकारक राहणार नाही, परंतु ही सवलत केवळ अशा वाहनांसाठी लागू राहील जे ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम (Driver Assist System) ने सुसज्ज असतील.
ड्रायव्हर असिस्ट सिस्टीममध्ये 360 अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य (live feed) उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे.
ही प्रणाली वाहन रिव्हर्समध्ये असताना मागून येणाऱ्या वाहनचालकांना व इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पुरेशी पूर्वसूचना देईल व चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे देईल.