पालघर-योगेश चांदेकर
पालघर आयुष्यात संपत्ती कमवता येते. मालमत्ता जमावता येते; परंतु माणसं कमवणं फार थोड्यांना जमतं. त्यात कुंदन संखे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. माणसं जोडणाऱ्या आणि माणसं जपणाऱ्या या माणसाचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
जो वर्षाचा विचार करतो
तो धान्य पेरतो
जो दहा वर्षांचा विचार करतो
तो झाडे लावतो
जो आयुष्यभराचा विचार करतो
तो माणूस जोडतो आणि
जो माणूस जोडतो
तोच आयुष्यात यशस्वी होत असतो
असं एक काव्य आहे. त्याचा आधार घेतला, तर माणसं जोडणं ही एक कला आहे आणि राजकारणात तर माणसं जोडणारी माणसंच यशस्वी होत असतात. केवळ माणसं जोडून चालत नाहीत, तर ती जपावी लागतात, हे काम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी अतिशय इमानेइतबारे केलं आहे. त्याची पावती त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानातून मिळाली आहे, असं वाटतं. संकटाच्या काळात तोंड लपवणारी अनेक माणसं असतात; परंतु संकटात धावून जाणारी माणसं अतिशय कमी असतात. अशा कमी माणसात कुंदन संखे यांचा समावेश होतो. लोकांच्या सुखदुःखात तेवढ्याच समरसपणे सहभागी होणं, त्यांचं दुःख दूर करणं याला ते जीवनातील इतिकर्तव्यता मानतात. जिथं राहिले, ज्या पक्षाचे वावरले, त्या पक्षाचा विचार, त्या पक्षाची धोरणं त्यांनी गाव-पाड्यापर्यंत माणसा-माणसापर्यंत पोहोचवली. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम केलं. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणं वागलं, तर माणसं आपोआप जोडली जातात, हे त्यांच्या उदाहरणातून दिसतं. जगात पैशाशिवाय काही होत नाही, असं म्हणतात; परंतु पैसा हेच सर्वस्व असतं असंही नसतं. असलेल्या पैशाचा योग्य विनियोग करता आला पाहिजे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाता आलं पाहिजे. हे काम कुंदन संखे यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडलं आहे. राजकारणात माणसं जोडणं म्हणजे माणसाचं व्यवस्थापन करणं असतं. त्यात जो यशस्वी होतो, त्याला यश मिळतं.
बोले तैसा चाले! त्याची वंदावी पाऊले! असं म्हटलं जातं. हे संतवचन कुंदन संखे यांनी प्रत्यक्षात आणलं आहे. इतरांना समाजसेवेचा डोस देणं सोप असतं; परंतु समाजसेवा आचरणातून दाखवून द्यायची असते. ती कुंदन यांनी दाखवून दिली आहे. सहसा लोक अवयव दान आणि देहदान करायला फारसे इच्छुक नसतात. कितीही समाज प्रबोधन केलं जात असलं, तरी भावनेचा मुद्दा पुढं केला जात असतो; परंतु वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी विवेक बुद्धीनं विचार करून तसा निर्णय घेण्याचं धाडस कुंदन यांनी दाखवलं. त्यांच्यासाठी पैसा सर्वस्व नसून माणुसकी जपणं आणि आपुलकीनं वागणं हे सर्वस्व आहे. माणसाचा तो धर्म आहे.
माणसं जोडण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नसते. आपलं आचरण, बोलणं, व्यवहार जर योग्य असेल, तर माणसं आपोआप जोडली जातात. कुंदन यांच्याकडं पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं सामाजिक कामातून आलेलं समाधान, दातृतत्वासाठी सतत पुढं असलेला हात आणि वैचारिक बांधिलकी पाहिली, तर त्यांच्याभोवती मोहोळाच्या माशासारखी माणसं जमा झाली नसती, तरच नवल. आपण जिथं उभं राहू, तिथं लोक जमा झाले आणि समूह तयार झाला, तर त्याला माणसं जोडण्याची कला अवगत आहे, असं म्हणतात. ही कला कुंदन यांच्याकडं निश्चित आहे. माणूस पैशाला सलाम करतो असं म्हटलं जातं असलं, तरी ते पूर्ण सत्य नाही. असतील शितं, तर जमतील भुतं असं म्हणतात; परंतु ते काही त्रिकालाबाधित सत्य नाही. अडीअडचणीला धावून जाणारी माणसं ही कधी पैशाचा विचार करत नाहीत. जी माणसं पैसा. समाजकार्य आणि बुद्धी अशा त्रिवेणी संगमात वावरत असतात, ती माणसं आयुष्याचं सोनं करतात. कुंदन यांना ते जमलं आहे. लोकांचं व्यवस्थापन करणं सगळ्यांनाच जमत असं नाही. मुळात त्यासाठी लोकांबरोबर राहून, त्यांच्यातील एक होऊन त्यांच्यातील आनंद शोधणं आणि त्यांच्यात आनंद निर्माण करणे हे ज्याला जमतं, त्याला माणसाचं व्यवस्थापन आपोआप जमतं. एकट्यानं काम करणं आणि समाजाला बरोबर घेऊन काम करणं यात मोठा फरक असतो. ते फार थोड्या लोकांना जमतं. हा माझा प्रांत नाही, असं सांगून हात झटकणारे काही कमी नाहीत. कुंदन संखे त्यात मोडत नाहीत. त्यांना कामासाठी कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. ते सर्वच क्षेत्र आपला प्रांत आहे असं समजून काम करून घेत असतात. काही व्यक्ती पदासाठी काम करतात, तर काही व्यक्ती कामात समाधान मानतात. या दुसऱ्या प्रकारात कुंदन मोडतात. इतरांचं म्हणणं ऐकून घेणं, स्वतःचा इगो बाजूला ठेवणं आणि सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांचा विश्वास संपादित करणं, त्यासाठी नम्रपणे बोलणं, शांतपणे म्हणणं ऐकून घेणं आणि स्वतःच्या कामातून मित्रांसमोर आदर्श ठेवणं हे आवश्यक असतं. ही सारी गुणकौशल्यं कुंदन यांच्या ठायीठायी भरलेली असल्यामुळं ते एक माणसाचं व्यवस्थापन करणारा उत्कृष्ट व्यवस्थापक बनले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या काळात माणसं माणसाजवळ जात नव्हती. मदत मागण्यासाठी आलेल्यांनाही जवळ येऊ देत नव्हती. कोरोना योद्धे म्हणजे आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी, आशा सेविका. असे सर्व घटक मात्र रात्रंदिन राबत होते. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्यानं प्राणही गमवावे लागले. अशा वेळी कुंदन यांनी या कोरोनायोद्ध्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मदत केली. आपल्या परिसरात अडचणी कोणत्या आहेत आणि काय केलं म्हणजे प्रश्न सुटतील, याची माहिती असावी लागते. पालघर परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी गुन्हेगारांचा शोध हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. संखे यांनी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याचा उपयोग पोलिसांना चोर शोधण्यासाठी झाला. शिवसेनेची स्थापनाच मुळी सामाजिक कामासाठी झाली आहे. तो संस्कार कुंदन यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाला. नंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी सामाजिक कामाची परंपरा जपली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतानाही सामाजिक कामात त्यांनी कुठलाही खंड पडू दिला नाही. बोईसरजवळील सरावली गावात गॅस गळती झाली. या गळतीत जखमी झालेले कुटुंब अतिशय गरिबीतील होते. या आदिवासी, गरीब कुटुंबाला गुजरातमध्ये वलसाडला घेऊन त्यावर उपचार करण्याची आवश्यकता होती. अशावेळी कुंदन संखे स्वतः धावून गेले. या कुटुंबाला मदत केली. दातृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या माणसांच्या पाठीशी समाज उभा राहिला, तर नक्कीच त्यांच्या हातून अनेक कामं होतात. कुंदन यांच्या मागं समाज उभा राहिला आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. नागरी भाग वगळता डोंगरी आणि सागरी भागात आरोग्यसेवा पोहोचलेली नाही. अशावेळी गतिमान आरोग्य सेवा आणि लोकांना तातडीनं अन्यत्र हलवण्याची सुविधा उपलब्ध होणं आवश्यक होतं. संखे यांनी त्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांनी हजारो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मोठी मदत केली, प्लाज्मा दानह अन्य दानाच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं सामाजिक काम निश्चितच वाखाण्याजोगं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्या निर्धार या सेवा संस्थेच्या कामावर शाबासकीची थाप दिली. संखे यांचं कार्य राजकारणापलीकडचं असून सामाजिक भावनेतून त्यांनी केलेलं काम नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय विद्यार्थी सेनेच्या तालुकाप्रमुख पदापासून त्यांनी सुरू केलेलं संघटन पुढं वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून त्यांच्या उपयोगी आलं. पद कुठलं याच्यापेक्षा माझ्या पदाचा सामान्य माणसांना किती आणि कसा उपयोग होतो, हे जास्त महत्त्वाचं असतं, असं त्यांनी एका ठिकाणी सांगितलं होतं.
दिव्यांगासाठी ही त्यांनी मोठं काम केलं आहे. वंदे मातरम संस्थेनं स्वयंरोजगारातून करीत असलेल्या कामासाठी एक वास्तूरुपी केबिन बनवून देण्याची मागणी त्यांच्याकडं केली होती. त्यांनी ही मागणी पूर्ण केली. निर्धार या सेवा संस्थेनं दिव्यांगांना एक केबिन उपलब्ध करून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या या केबिनमुळं दिव्यांगांना रोजगार मिळाला. स्वाभिमानानं आपकमाई करण्याचं काम आता दिव्यांग करीत असून संखे यांच्या मदतीबाबत त्यांची भावना कृतज्ञतेची आहे. पक्षाची ध्येयधोरणं राबवण्यासाठी ते सातत्यानं आघाडीवर असतात. प्रसंगी रस्त्यावर येतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघात व अन्य अनेक प्रश्नी ते धावून जातात. ओबीसीच्या आरक्षणाला जेव्हा धोका निर्माण झाला, तेव्हा रस्त्यावर उतरून त्यांनी पालघर जिल्ह्यातील ओबीसींचं संघटन केलं. अशा कामाच्या माध्यमातून कुंदन संखे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. माणसं जोडणारा आणि आपुलकीनं माणसं जपून ठेवणारा हा समाज कार्यकर्ता कायम उत्साही असतो. कधी थकलेला नसतो. सामाजिक कामातून मिळालेलं समाधान हेच त्यांच्या चिरंतन उत्साहाचं कारण आहे.