पालघर-योगेश चांदेकर
उपसरपंचाच्या भावाच्या नावावर पैसे जमा
डॉक्टरांनीही घेतले हात धुवून?
पालघरः शासन स्तरावरून मानव विकास शिबिरे भरवण्यासाठी निधी मिळत असतो. या निधीचा वापर ज्या संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जातात, त्या संस्थांना तसेच रुग्णांना औषधांसाठी या निधीतून पैशाची तरतूद करणे अपेक्षित असताना डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेल्या निधीला पाय फुटले आहेत. गंजाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या भावाच्या नावावर हा निधी जमा झाला असून हा उघड उघड गैरव्यवहार असल्याचा आरोप वायडा यांनी केला आहे.
ज्या व्यक्तीचा शिबिर आयोजित करण्याशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीच्या नावावर निधी जमा केल्याने त्याबाबत साशंकता निर्माण झाली असून सामाजिक कार्यकर्ते श्रीधर वायडा यांनी बँक खात्याच्या तपशीलासह थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
चार प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरप्रकार?
डहाणू तालुक्यातील आशागड, गंजाड, तवा, ऐना या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाकडून १५ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम मानव विकास शिबिरासाठी मिळाली होती. मानव विकास शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली लाभार्थी असतात. ज्या लाभार्थींचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे, त्यांच्यासाठी औषधे उपलब्ध करून दिली जातात. मानव विकास शिबिरात लागणारी औषधे स्मता फाउंडेशनच्या वतीने दिली जातात. स्मता फाउंडेशन ही औषधे अशा शिबिरांसाठी मोफत देते. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही राज्य सरकारकडून मोफत औषधे मिळत असताना काही डॉक्टर मात्र अशा प्रकारची औषधे बाहेरून आणायला भाग पाडत असल्याचेही बोलले जात आहे.
बेकायदेशीर पैसे जमा
वायडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात गंजाड, आशागड, तवा, ऐना या चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावे पंधरा लाख ३६ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचा तपशील दिला आहे. पंचायत समितीमार्फत ही रक्कम प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली जाते. ज्या महिला बचत गटांनी किंवा स्वयंसेवी संस्थेने मानव विकास शिबीर घेतले, त्यांच्या खात्यात निधी जमा करण्याऐवजी उपसरपंचाचे भाऊ गणेश कामडी यांच्या नावावर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातून ६४ हजार गंजाड प्राथमीक आरोग्यकेंद्रातून १ लाख ४४ हजार, तवा प्राथमीक आरोग्यकेंद्रातून १ लाख ४४ हजार , ऐना प्राथमीक आरोग्यकेंद्रातून १ लाख ४४ हजार, रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचा तपशील वायडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जोडला आहे. त्यासोबत कागदपत्रे ही दिली आहेत.
वैद्यकीय अधिकारीही लाभार्थी!?
मानव विकास शिबिराशी ज्यांचा काही संबंध नाहीत, जे शिबिर आयोजन करणाऱ्या कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नाहीत, त्यांच्या नावावर ही रक्कम जमा केल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी ही यात सामील आहे की काय? अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्याचे कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच ही चार लाख ५९ हजार रुपयांची रक्कम संबंधित खात्यात भरणा करण्यास बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य बँकांना पत्र दिले. हे सर्व प्रकार संशयास्पद असून याबाबत चौकशी करण्याची मागणी वायडा यांनी केली आहे.
डॉकटरांच्या वैयक्तिक खात्यात पैसे
मानव विकास शिबिराच्या नावाखाली दोन लाख चार हजार रुपयांचे मानधन कोणाच्या खात्यावर जमा करण्यात आले, याचा तपशील दिला असून त्यात डॉक्टरांचीही नावे आहेत. डॉक्टरांच्या बचत खात्यात ही रक्कम कशी जमा करण्यात आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. डॉ. करण धांडे, डॉ. आदिती भानुशाली, प्रदीप अरुण मोहिते, गणेश कामडी यांच्यासह लाईफ लाईन इंटरप्राईजेच्या नावे पैसे जमा करण्यात आले असून याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतात आणि या पैशाला फुटलेल्या पायाची कशी चौकशी करतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार अन्य ठिकाणी झाले आहेत, की काय याचीही आता तपासणी करावी अशी मागणी वायडा यांनी केली आहे.
‘मानव विकास शिबिराच्या आयोजनासाठी सरकारकडून येणाऱ्या निधीचा लाखो रुपयांचा गैरवापर झाला असून, जिल्हा आरोग्य विभागास पत्र देऊन त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
श्रीधर वायडा, सामाजिक कार्यकर्ते, गंजाड, तालुका डहाणू