पालघर-योगेश चांदेकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड.काशिनाथ चौधरी यांचाही पालघर विधानसभेवर दावा
जागावाटपावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य
पालघरः विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असली, तरी अद्याप महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात जागावाटप झालेले नाही. असे असतानाच पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास महाविकास आघाडीतील अनेक नेते इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने ॲड. काशिनाथ चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा व जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे.
पालघर विधानसभेत आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. महाविकास आघाडीतही पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन आहे. पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे विक्रमगड मतदार संघातून निवडून आलेले आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघ मात्र सातत्याने शिवसेनेच्या वाट्याला राहिला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा, असे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसचाही मतदारसंघावर दावा
काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला असून, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसमध्ये आणून त्याला पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. काशिनाथ चौधरी यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याबाबत चर्चा केली. पवार यांनी पालघर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाटेला सुटतो, हे ठरल्यानंतर उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून संघटन
ॲड. काशिनाथ चौधरी यांची राजकीय कारकीर्द आणि संघटनात्मक बांधणी तशी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू झाली आहे. त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तलासरी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालय प्रमुख म्हणूनही त्यांची निवड झाली होती. तलासरीच्या कॉम्रेड गोदावरील शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या जीएसपदी ते निवडून आले होते. याशिवाय तलासरी आजी-माजी विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष आहेत. अतिशय कमी वयात ते राजकारणात आले आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. २००७ मध्ये त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली; परंतु अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला.
जिल्हा परिषदेवर संधी
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या मोडगाव गटाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. या नियुक्तीनंतर अवघ्या तीन वर्षात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या परंपरागत बालेकिल्ल्यातून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर दोनदा ते जिल्हा परिषदेला निवडून आले. जिल्हा परिषदेत पक्षाने त्यांच्यावर बांधकाम सभापतिपदाची ही जबाबदारी दिली होती. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची २०१४ मध्ये उमेदवारी दिली; परंतु त्यांचा पराभव झाला. असे असले, तरी विजयी उमेदवाराच्या विरोधात मतविभागणी झाल्याने त्याचा फायदा विजयी उमेदवाराला मिळाला. ॲड. चौधरी यांना २७ हजार ९६३ मते मिळाली होती.

अर्थ व बांधकाम समितीचे सभापती
जिल्हा परिषदेच्या २०१५ च्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्याच वर्षी त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली. २०२० मध्ये पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि भाजपच्या परंपरागत मतदारसंघातून ते सर्वाधिक मतांनी विजयी झाले. नंतर पक्षाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ या महत्त्वाच्या समितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. संघटनात्मक कामातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ सामाजिक कामाच्या जोरावर ते राजकारणात आले आणि १५ वर्षे जिल्हा परिषद व अन्य अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. परिवर्तन बहुविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. पालघर विधानसभा मतदारसंघ हा कोणाच्या वाट्याला येतो, त्यावर उमेदवारी ठरणार आहे; पक्षाने उमेदवारी दिली तर नेटाने विजयासाठी प्रयत्न करू; परंतु हा मतदारसंघ जर मित्र पक्षाला गेला, तर पक्षावर कोणतीही नाराजी न दाखवता मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी तेवढ्याच जोमाने प्रयत्न करू. पक्षाने एकवेळा विधानसभा तसेच तीन वेळा जिल्हा परिषद सदस्यपद, अर्थ व बांधकाम समिती सभापती अशी अनेक पदे दिली आहेत.त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील
ॲड. काशिनाथ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस

















