पालघर-योगेश चांदेकर
पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिवसेनेचाच वरचष्मा उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी यांचा दावा
पालघरः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू येथील शासकीय विश्रामगृह डहाणू येथे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुफिज मिरझा, रईस मिरझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेनेचे उपनेते राजेश शहा, पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, नीलम म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी, डहाणू पंचायत समितीचे माजी उपसभापती पिंटू गहला, युवा सेना जिल्हा प्रमुख कुणाल पाटील, जतीन मर्दे, अक्षय मर्दे, शैला डोंगरे, यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमुळे अनेक कार्यकर्ते या वेळी शिवसेनेत दाखल झाले. त्यांचे स्वागत करून चुरी म्हणाले, की पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह वेगवेगळ्या संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात राहणार
आगामी निवडणुकीतही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांवर शिवसेनेचे नक्की वर्चस्व राहील. कार्यकर्त्यांचा जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह असला, तरी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत आम्ही पोहचवू. अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भावना असू शकतात; परंतु युती करायची, की नाही याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास बांधील आहोत.
लाडकी सून योजनेची सुरुवात पालघरमधून
या वेळी वाढाण यांनी शिवसेना हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा 24 तास सामान्यांच्या अडीअडचणी धावून जातो, हे सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना शिंदे यांनी सन्मान दिला. राज्यात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हुंडा किंवा अन्य कारणासाठी महिलांचा छळ होतो. अशावेळी अडचणीतील महिलांना मार्गदर्शन कसे करायचे आणि त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा, यासाठी शिंदे यांनी आता लाडकी सून योजना हाती घेतली आहे. या योजनेचे प्रशिक्षण तारापूर येथे 12 तारखेला होणार असून पालघर जिल्ह्यातून राज्यव्यापी योजनेची सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली

शिंदे यांच्या योजना जनतेपर्यंत पोचवल्या, तरी यश
मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी महिलांसाठी तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक सामाजिक योजना सुरू केल्या. या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. लोकांच्या अडीअडचणीसाठी सातत्याने उभी राहणारी शिवसेना ही आपल्या पक्षाची प्रतिमा असून ही प्रतिमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायची आहे. महिलांमध्ये शिवसेना अधिक पातळीवर पोहोचवण्याचे काम आता प्रवेश केलेले अनेक कार्यकर्ते करतील, याबद्दल मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.
आगामी निवडणूतिच्या तयारीला लागा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील. आता कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण आहे आणि तिथे कोणाला संधी मिळू शकते, याची गणिते आपल्या कार्यकर्त्यांना माहीत आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. त्यासाठी लागेल ती मदत वरिष्ठ पातळीवरून आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही वाढाण यांनी दिली.

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची चर्चा
या वेळी पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रश्न मांडला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची अधिकाधिक रक्कम संबंधिताना देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

















