शहरातील दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सुमारे ३,०४० दुकानदारांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दुकानांवर पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते.
मुंबईत सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. प्रत्येक दुकानाच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा पद्धतीने देवनागरी लिपीत मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायद्यात सुधारणा केली आणि विधानसभेत एकमताने ठराव मंजूर केला. त्यानुसार राज्यातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांना मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे, मात्र मुंबईतील अनेक दुकानदारांनी या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचे पालिकेच्या या कारवाईमुळे दिसून आले.
पालिकेने सुमारे तीन हजारांवर दुकानांना नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत शहर व उपनगरांतील ५२२ हून अधिक दुकाने व आस्थापनांवर कारवाई करून ४६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त ३,०४० दुकाने व आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. त्या दुकानदारांना उच्च न्यायालयात हजेरी लावावी लागेल, तिथे न्यायालय दंडाची रक्कम ठरवेल, असे सांगण्यात आले.
६० निरीक्षकांची नियुक्ती
मराठी पाटी नसेल त्या दुकानांचा फोटो काढला जात आहे. पुरावा म्हणून तो फोटो रेकॉर्डवर नोंद करून संबंधितांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. दुकानांची तपासणी करण्यासाठी विविध वॉर्ड आणि विभाग पातळीवर ६० निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दररोज दोन ते तीन हजार दुकानांची तपासणी करण्याचे नियोजन पालिकेचे आहे.