पालघर-योगेश चांदेकर
रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात ठिय्या
दोन महिन्यांत प्रश्न निकाली काढण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
पालघरः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी डहाणू प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तिथे प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून तिथेच ठिय्या मांडला. रात्री अकरा वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. अखेर तहसीलदारांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर वारंवार आंदोलन करूनही प्रशासन काहीच निर्णय घेत नाही. त्यामुळे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डहाणू प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला;परंतु प्रांताधिकारी आंदोलकांना सामोरे गेले नाहीत. ते कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
तहसील कार्यालयाच्या आवारात चुलांगण
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा त्यानंतर तहसील कार्यालयाकडे वळवला. तहसील कार्यालयातही या मोर्चाची सुरुवातीला दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी तेथेच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही, तोपर्यंत तहसीलदार कार्यालय सोडायचे नाही, असा ठाम निर्धार करून आंदोलकांनी रात्रीचे जेवण तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साहित्य मागवले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच चुलांगण मांडून त्यावर स्वयंपाकही केला. तेथेच बसून आंदोलकांनी पत्रावळ्यावर भोजन केले आणि नंतर आंदोलन पुन्हा सुरू केले.
नुकसान भरपाई प्रलंबित
गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घरांच्या आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही आदिवासी शेतकऱ्यांच्या घरांच्या सातबारावर नोंदी नाहीत तसेच या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई अद्याप मिळालेल नाही, असे सांगून प्रशासन शेतकरी विरोधी आहे. आदिवासींच्या विरोधात आहे असे आरोप या वेळी कॉम्रेड लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना यांनी झालेल्या सभेत केले.
रात्री उशिरा तहसीसलदारांची बैठक
आंदोलन संपणार नाही आणि आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा तहसीलदार सुनील कोळी कार्यालयात आले. आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आदिवासींच्या घरांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासंदर्भात तसेच अनेक प्रश्नासंदर्भात येत्या दोन महिन्यात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले; परंतु पुढच्या दोन महिन्यांत प्रश्न निकाली निघाले नाहीत, तर मात्र आंदोलन अधिक तीव्र आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.