banner 728x90

आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची विधानसभेत छाप

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


पहिल्याच भाषणात काव्याचा आधार घेत सरकारचे केले कौतुक
मतदारसंघातील विविध प्रश्नांची मांडणी

banner 325x300

पालघरः वसई विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आपल्या पहिल्याच भाषणात त्यांच्या अभ्यासूपणाची चुणूक सभागृहाला दाखवली. राज्य सरकारच्या गेल्या अडीच वर्षातील कामाचे कौतुक करताना यापुढेही विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वसई-विरार विधानसभा मतदारसंघ गेल्या ३५ वर्षांपासून दहशतीच्या दलदलीत होता. या दलदलीत प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तसेच एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे कमळ फुलल्याचे सांगून आ. दुबे-पंडित यांनी या दोन नेत्यांसाठी कवितेच्या चार ओळी सभागृहाला ऐकवल्या.

आमच्या संघर्षाची दखल घेतल्याचे समाधान
राज्य सरकारने १ मे २०२४ रोजी अपत्याच्या नावापुढे आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महिलांचा आत्मसन्मान वाढवणारा आहे. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही हे वंदन आहे, असे सांगून या नाव समाविष्टसाठी आम्ही केलेल्या आंदोलनाला यश आल्याने आमची स्वप्नपूर्ती झाली; परंतु एक मे २०२४ पूर्वी जन्माला आलेल्या अपत्यांच्या नावात वडिलांबरोबर आईचे नाव समाविष्ट करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

महिला धोरणाबद्दल कौतुक
राज्य सरकारने महिलांच्या विविध प्रश्नांची दखल घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी महिला धोरण जाहीर केले. महाराष्ट्र हे महिलांविषयक चार धोरणे जाहीर करणारे देशातील पहिलेच राज्य असून एक महिला आमदार म्हणून सरकारच्या या निर्णयाचा आपल्याला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.

मेट्रो वसई-विरारपर्यंत नेण्याची मागणी
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलेल्या अधिवेशनातील अभिभाषणाचा संदर्भ देत आ. दुबे-पंडित यांनी भाईंदरपर्यंत आलेली मेट्रो वसई-विरारपर्यंत नेण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी वसई, विरार, भाईंदर परिसरात वाढलेल्या लोकसंख्येचा आणि या भागातील नागरिकांचा मुंबईशी असलेल्या दैनंदिन संपर्काचा उल्लेख केला. या भागातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी भाईंदरहून वसई-विरारपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

जलजीवन आणि अमृत योजनेतून पाण्याची मागणी
राज्यात जलजीवन मिशन योजना राबवली जाते. त्यातून घराघरात पाणी दिले जाते; परंतु वसई-विरार भाग हा पाण्यासाठी अक्षरशः तडफडतो आहे. या भागातील आदिवासी वस्ती, पाडे यांचा समावेश जलजीवन योजनेत करावा. त्यासोबतच शहरी भागातील चाळी, झोपडपट्टीला अमृत पाणी योजनेतून घराघरात पाणी देण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

हरित पट्टा वाचवताना काँग्रेसचा लाठीमार
राज्यपालांनी हरित पट्ट्याचा केलेला उल्लेख निदर्शनास आणून वसई-विरार परिसरात गुंडांची दहशत मोडून काढून तत्कालीन आमदार विवेक पंडित व आम्ही हरित पट्टा ठेवण्यासाठी संघर्ष केला. तत्कालीन काँग्रेस सरकारने आमच्यावर लाठीमार केला, असा आरोप आ. दुबे-पंडित यांनी केला. हरित पट्टा वाचवण्यासाठी आमचे अजूनही प्रयत्न असून सरकारने या कामात योगदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

वसई-विरारचे नाव सभागृहात उंचावले
महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठरावही आ. दुबे-पंडित यांनी मांडला. एक महिला वसई विरारसारख्या प्रचंड दहशत असलेल्या परिसरातून निवडून येऊन आपल्या पहिल्याच भाषणात मतदार संघाचे प्रश्न मांडते आणि या प्रश्नातून वसई-विरार आणि पालघरचे नाव राज्यभर करते हे या निमित्ताने सभागृहाला पाहायला मिळाले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!