पालघर-योगेश चांदेकर
वारंवार धाय मोकळून फोडला हंबरडा
मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वासघात केल्याचा आरोप
ठाकरेंसारख्या देवमाणसाला फसवल्याची सल
पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी राजेंद्र गावित यांना देण्यात आल्याने आमदार श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे वनगा वारंवार धाय मोकलून रडले. अतिशय भावविवश होऊन त्यांनी प्रामाणिकपणाचे हेच फळ काय, असा सवाल केला.
पालघर विधानसभा मतदारसंघातून वनगा यांच्या विरोधात नकारात्मक अहवाल असल्याचे कारण सांगून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. पालघरऐवजी किमान शेजारच्या डहाणू विधानसभा मतदारसंघात तरी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा वनगा यांना होती; परंतु हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला. ठाणे जिल्ह्यात भाजप वाढवण्यात चिंतामण वनगा आणि विष्णू सवरा यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मुलांना राजकारणात प्रस्थापित करताना मात्र दुजाभाव केल्याची टीका आता होत आहे. हेमंत सवरा यांना भाजपने लोकसभेवर पाठवले; परंतु श्रीनिवास यांना मात्र विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास अतिशय भावविवश झाले.
ठाकरे शब्द पाळणारे, शिंदे विश्वासघातकी
गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास यांना उमेदवारी दिली होती. लोकसभेच्या वेळी दिलेला शब्द उद्धव यांनी पाळला; परंतु गेल्या अडीच वर्षाच्या बंडाच्या वेळी उद्धव यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या श्रीनिवास यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता; परंतु तो पाळला गेला नाही. तसा आरोपच आमदार वनगा यांनी केला असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची वारंवार माफी मागितली. उद्धव ठाकरे हे अतिशय प्रामाणिक आणि शब्द पाळणारे नेते आहेत; परंतु माझ्याकडून चूक झाली आणि मी शिंदे यांच्यासोबत गेलो. त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी देण्याचा शब्द त्यांनी दिला होता; परंतु तो पाळला गेला नाही.
भाजपकडूनही फसवणूक झाल्याची व्यथा
पूर्वीही भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला नाही. त्या वेळी मला डावलण्यात आले. माझ्या वडिलांपासून केलेल्या प्रामाणिकपणाचे हेच फळ आम्हाला मिळाले आहे, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. स्वतः वनगा यांनी उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते. ते दिलेला शब्द पाळत होते; परंतु एकनाथ शिंदे यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि विश्वासघात झाला, असे सांगितले. हीच भावना श्रीनिवास यांच्या पत्नीने ही व्यक्त केली.
ठाकरें यांना तोंड कसे दाखवू?
ठाकरे यांची फोन करून माफी मागणार का किंवा त्यांना भेटणार का, या प्रश्नावर वनगा आणखीच रडायला लागले. कोणत्या तोंडाने त्यांना भेटू, कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर जाऊ अशी विचारणा करून देव माणसाची नकळत का होईना माझ्याकडून फसवणूक झाली आणि ज्यांच्या बरोबर गेलो त्यांनी तर विश्वासघातच केला, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांचे कौतुक करताना शिंदे यांच्यावर विश्वासघातकीपणाचा शिक्का मारला.
बरेवाईट केले, तर आम्ही काय करायचे?
वनगा यांची वारंवार रडणारी चित्रफित आता सर्वत्र फिरत असून तिचीच आता अधिक चर्चा होत आहे
दरम्यान, श्रीनिवास वनगा यांनी कालपासून जेवण सोडले आहे. ते कुणाशी बोलत नाहीत. आत्महत्या करू, असे ते सांगत असल्याचा दावा त्यांच्या आईने आणि पत्नीने केला आहे, तर त्यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या मुलाने काही बरेवाईट केले, तर आम्ही काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला.