संसदेचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचे अधिवेशन आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशाने ऐक्याची ताकद आणि एक स्वराचे सामर्थ्य अनुभवले आहे.
विजयोत्सवाचे हे पर्व पावसाळी अधिवेशनात त्याच भावनेतून प्रकट होऊन देशाच्या सैन्यशक्तीची प्रशंसा आणि देशाच्या सामर्थ्याचे गौरवगान करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.२१) व्यक्त केला.
राजकीय पक्ष वेगवेगळे असले, त्यांचा अजेंडा आणि भूमिका स्वतंत्र असल्या आणि पक्षहितावरून मतभिन्नता असली तरी देशहितासाठी सर्वांची मने एकत्र यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आमच्या देशाची राज्यघटना विजयी होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या दहा वर्षांत शांती आणि प्रगती खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून देश दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या अनेक प्रकारच्या हिंसक घटनांचा बळी ठरला.
पण आज नक्षलवाद आणि माओवादाचा परिघ वेगाने संकुचित होत आहे. देशातील शेकडो जिल्हे नक्षलवादापासून मुक्त होऊन मोकळा श्वास घेत आहेत. कालपर्यंत ज्या लाल मार्गिका होत्या, आज त्या हरित विकास क्षेत्रांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यसभेत पाच सदस्यांचा शपथविधी
पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यसभेत बीरेंद्रप्रसाद बैश्य (आगप, आसाम), कणाद पुरकायस्थ (भाजप, आसाम), डॉ. मीनाक्षी जैन (नामनियुक्त दिल्ली), सी. सदानंदन मास्टर (नामनियुक्त, केरळ) आणि हर्षवर्धन श्रृंगला (नामनियुक्त, सिक्कीम) यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राष्ट्रपती नियुक्त चौथे सदस्य उज्ज्वल निकम मात्र अनुपस्थित होते.