उपनगरीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व सुसह्य करण्यासाठी मुंबईतील सर्व लोकल ट्रेन वातानुकूलित (एसी) करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी प्रवाशांवर कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता ही सुविधा देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली.
मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना दारात उभे असलेल्या प्रवाशांच्या अडकलेल्या बॅगांमुळे दोन लोकल ट्रेनमध्ये घर्षण होऊन, १३ प्रवासी रूळावर फेकले गेले होते. यामध्ये चार जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले. ही घटना अतिशय गंभीर मानून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी तब्बल पाऊण तास चर्चा केली. या चर्चेत उपनगरी रेल्वेच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी विविध उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या प्रगत शहरात आजही लाखो प्रवासी अपुऱ्या सुविधा असलेल्या लोकलने प्रवास करतात. आपल्या मेट्रो सेवा एसी असताना, लोकल प्रवाशांना का नाही? लोकल प्रवासी ‘दुय्यम’ नाहीत. म्हणूनच सर्व लोकल ट्रेन एसी करण्याचा आमचा ठाम आग्रह आहे.”
ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढ न करता एसी लोकलचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भार न लावता त्यांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सेवा देण्याचा प्रयत्न होईल. या संदर्भात केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे काम करत असून, मुंब्रा दुर्घटनेतून धडा घेत सकारात्मक पावले उचलली जातील.
दरवाजे लावण्याचा विचार आणि व्हेंटिलेशनची हमी
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दरवाजे बसवण्याचा विचार सुरू असून, त्यासोबत योग्य व्हेंटिलेशनची व्यवस्था करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. काही प्रवाशांनी ‘दार लावल्यास गुदमरायला होतं’ अशी भीती व्यक्त केली होती, यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सरकारही सुज्ञ आहे, दरवाजे लावले तर योग्य वायुवीजनही द्यावं लागेल, याची आम्हाला जाणीव आहे.”
गर्दी नियंत्रणासाठी कार्यालयीन वेळेत लवचिकता
मुख्यमंत्र्यांनी यावेळी खासगी व शासकीय कार्यालयांच्या वेळा लवचिक करण्यावरही भर दिला. “शासकीय कार्यालयांना फ्लेक्सिबल टायमिंगचा पर्याय देण्यात आला आहे. खासगी क्षेत्रात तो अमलात आणणं जरा कठीण असलं तरी, यात सुधारणा करण्याचा प्रयत्न होईल,” असं त्यांनी नमूद केलं.
सार्वजनिक वाहतूक आणखी सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबईमधील प्रचंड लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो नेटवर्क अद्याप पूर्ण झालेलं नाही, आणि त्यामुळे लोकल ट्रेनवरचा भार अधिकच वाढतो. त्यामुळे फेऱ्या वाढवणं, रेल्वे वळणांची फेरमांडणी करणं, आणि प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.