गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी नुकतंच मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची ही बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष आणि दोन्ही उपाध्यक्षांसोबत चर्चा केली.
रिक्त पदे भरली जाणार
यावेळी विविध विभागांमधून सादर करण्यात आलेल्या अहवालांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. या विभागीय अहवाल सादर झाल्यानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मनसेची सद्यस्थिती काय, त्यात किती रिक्त पदे आहेत, यावरही चर्चा केली. ही सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यानुसार रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकतंच या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महिला खासदारांचे कौतुक केले. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभाताई बच्छाव यांचे अभिनंदन. एका सदगृहस्थाला पळून जावे लागल्याबद्दल त्यांनी या महिला नेत्यांचे अभिनंदन केले. स्वत:वर वेळ येते, तेव्हा स्वाभिमान आणि अभिमान दाखवावा लागतो, असे बाळा नांदगावकरांनी नमूद केले.
महायुतीने काय करावं हा त्यांचा प्रश्न
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी मातृभाषेबद्दल ठाम भूमिका घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हिंदी चित्रपटात काम करूनसुद्धा त्यांनी ती भूमिका घेतली, असेही बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. यानंतर त्यांना महापालिका निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केले. महायुती आणि महाआघाडीने काय करावे, हा त्यांचा विषय आहे. मनसे आपले काम करत राहील, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.