मुंबईत गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती काही समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. पण ही माहिती चुकीची असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
मुंबईत ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती आज सकाळपासून काही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. ज्यात बेपत्ता झालेल्यांमध्ये मुलींचा जास्त समावेश असल्याचाही दावा केला गेला. पण मुंबई पोलिसांनी ट्विट करत अशी कोणतीही घटना मुंबईत घडलेली नाही हे स्पष्ट केलेलं आहे. तसंच खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो.
या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई…
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) February 2, 2026
“काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो. या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे”, असं पोलिसांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

















