मान्सूनचं रविवारी महाराष्ट्रात आगमन झालं अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईसह उपनगरात रविवारी संध्याकाळपासूनच कोसळधारा पडत आहे. सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला.
त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. अति मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण, पनवेलहून सुटणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे, तर हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. एक्स्पेस रेल्वे कल्याण ते ठाण्यादरम्यान अतिशय संथ गतीने धावत आहेत, त्याचा परिणाम लोकल सेवेवरही होत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी मान्सून तळ कोकणात दाखल झाला, त्यामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईमध्येही रात्रभर रिपरिप सुरू होती. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. कुर्ला, अंधेरी,ठाणे, घाटकोपर, मुलुंड, कल्याण, माहिम, सांताक्रृज भांडूप, भिवंडीसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात लोकल सेवा विस्कळीत होत असल्यामुळे नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई लोकलची वाहतूक विस्कळी झाली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही १० ते १२ मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईसह राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोसळधार पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, पण दुसरीकडे संततधारेमुळे त्रासाचा सामनाही करावा लागत आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत.