मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
मुंब्रा स्टेशनजवळील ‘त्या’ वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे.
तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो सादर होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर विशेष चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन ट्रेन ७५ किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आल्या व त्यातील अंतराचे मोजमापही घेण्यात आले. या चाचणीत कोणताही धोका आढळून आला नाही.
या वळणाची रचना नियमानुसारच
या वळणाची रचना नियमानुसारच करण्यात आली असून, या भागात लोकलच्या गतीची मर्यादा १०५ किमी प्रतितास आहे. गर्दीच्या वेळेत रोज १८० हून अधिक लोकल या मार्गावर एकमेकांना क्रॉस करतात, तरीही अशा घटना क्वचितच घडतात. मुंबई विभागात मुंब्य्राच्या तुलनेत अधिक तीव्र वळण असलेली ठिकाणेही आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
१५ डब्यांची लोकल लवकरच धावणार
मध्य रेल्वेने अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याचे काम गतीने सुरू केले आहे. सध्या जलद आणि धिम्या मार्गांवर ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने काम प्रगतिपथावर आहे. काही तांत्रिक व भौगोलिक अडचणी असूनही रेल्वे प्रशासन त्या दूर करून जास्त क्षमतेच्या गाड्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.