राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत.
धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील 19 जिल्ह्यात 20 लाख 12 हजार 775 एक्कर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान
अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यात 20 लाख 12 हजार 775 एक्कर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एक्कर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालंय. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले, या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलंय.
187 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला
राज्यातील ऑगस्ट 2025 मधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमधील 187 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, 805110 हेक्टर म्हणजे तब्बल 2012775 एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 10000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले 11 जिल्हे समोर आले आहेत.
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे कोणते?
नांदेड : 285543 हेक्टरवरकील पिकांचे नुकसान
वाशिम 164557 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
यवतमाळ 80969 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बुलढाणा 74405 हेक्टरवरल पिकांचे नुकसान
अकोला 43703 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
सोलापूर 41472 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
हिंगोली 40000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे पाणीपुरवठा, वीज आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांना किराणा आणि औषधे मिळवणे कठीण झाले असून प्रशासनाकडून मदतीची मागणी होत आहे.