“भाजपचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले आहे. आताही भाजप आपल्यास मित्रपक्षांवर डाव टाकत असून आगामी आठ दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप बघायला मिळेल”, असा मोठा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले रविवारी (5 एप्रिल) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले यांनी पाज राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वीच ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाणार असल्याचा दावा केला आहे.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक बडे नेते, आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोले यांनी “मित्र पक्षांना संपवणे हा भाजपचा इतिहासच असल्याचे सांगितले. भाजप हा इतरांना गिळंकृत करणार पक्ष आहे. देशभरातील भाजपच्या मित्र पक्षांचे काय झाले यावर नजर टाकल्यास शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फार काही भवितव्य दिसत नाही. त्यांचे नेते भाजपमध्ये सामील झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. याची सुरुवात झाली आहे. असे झाल्यास राज्यात यापुढे भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील”, असे नाना पटोले म्हणाले.
मोठा खेळ शिल्लक असल्याचा पटोलेंचा दावा
“भाजप हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा गेम करणार असल्याचे मी आधीच बोललो होतो. आणखी मोठा खेळ शिल्लक आहे. फक्त आठ दिवस थांबा हे तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राची जनता भाजपच्या या खेळाला कंटाळली आहे. त्यांना पुन्हा सत्तेवर काँग्रेस हवी आहे. मात्र सरकारने बॅलेटवर मतदान घेतले तर जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देली”, असा दावाही नाना पटोले यांनी केला.
अशोक खरात प्रकरणावरुन सरकारवर टीका
यावेळी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर विचारले असता नाना पटोले म्हणाले, “अशोक खरात हा सत्ताधाऱ्यांनीच पोसलेला बाब असून त्याच्या आश्रमात बड्या नेत्यांची आणि अति महत्वाच्या व्यक्तींची ये-जा होती. यानंतर सरकार आणि गृहमंत्र्यांना त्याची माहिती नाही हे पटण्यासारखे नाही. सरकानेच त्याला पाठीशी घालते. आता हे प्रकरण अंगलट असल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

















