महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.
आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले.
दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर पंचायतींच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
विज्ञान भवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात, संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, राज्यमंत्री प्रो. एस.पी बघेल, सचिव विवेक भारद्वाज यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान केला. यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना, श्रीमती मुर्मू यांनी या पुरस्कारांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या मान्यतेचा उद्देश इतर पंचायतींना सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास व ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशाही व्यक्त केली.
पंचायती राज राष्ट्रीय पुरस्कार विविध श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले यामध्ये दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण 27 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला “स्वच्छ व हरित पंचायत” श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.
सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीला आज दोन श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिली श्रेणी – नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सर्वोत्तम ग्रामपंचायतचा प्रथम पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला तर याच ग्रामपंचायतीला ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत अव्वल स्थान प्राप्त झाला व प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. या श्रेणीत नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.
नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्तम ब्लॉक पंचायत या श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा या पंचायत समितीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तिरोरा पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला. कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्काराच्या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील बेळा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला. तर, पंचायत क्षमतानिर्माण सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत पुण्याच्या यशदा अकादमीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अकादमीचे उप महासंचालक व संचालक मल्लिनाथ कलशेट्टी व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वीकारला.
यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी विजेत्या पंचायतांना डिजिटल स्वरूपात पुरस्काराची रक्कम हस्तांतरित केली. मोडाळे ग्रामपंचातीला 50 लाख, मान्याचीवाडीला 2.5 कोटी (रूपये 1.5 कोटी व रूपये 1.00 कोटी ग्राम ऊर्जा श्रेणीत), तिरोरा पंचायत समितीला 1.5 कोटी, बेळा ग्रामपंचायतीला रूपये 1 कोटी आणि यशदा अकादमीला 50 लाख रुपये प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी ‘पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथा’ या पुस्तिकेचे अनावरण केले. या पुस्तिकेची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर करण्यात आली. याशिवाय, काही पंचायतांच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित एक माहितीपट देखील सादर करण्यात आला.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये विविध श्रेणींमध्ये पंचायतींना सन्मानित करण्यात आले, त्यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार, ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्थान पुरस्कार श्रेणींचा समावेश होता.