पालघर-योगेश चांदेकर
पालघरच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता
पालघरः डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे

भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी कोठोळे आमदार हरिश्चंद्र भोये, जगदीश राजपूत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे, सुशील औसरकर, यांच्या उपस्थितीत चौधरी यांच्यासह डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, कळमदेवी तसेच तलासरी तालुक्यातील हजारो अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कमळ हाती घेतले. शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट बहुजन विकास अधिक आघाडी तसेच श्रमजीवी संघटना व माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला.

ग्रामीण चेहऱ्यामुळे पक्षाला फायदा
चौधरी हे डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा ग्रामीण भागातील चेहरा म्हणून ओळखले जात होते. जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या चौधरी यांनी यापूर्वी बांधकाम समितीचे सभापतिपद देखील भूषवले आहे. ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क आणि पकड चांगली असल्याने त्यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
इतिहासात नोंद
या वेळी खा. सवरा म्हणाले, की भारतीय जनता पक्षाचे पुस्तक जेव्हा लिहिले जाईल, तेव्हा त्यात सर्वात मोठा प्रवेश सोहळा म्हणून चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची निश्चित नोंद होईल. भारतीय जनता पक्ष हे जगातील सर्वात मोठे कुटुंब आहे. या कुटुंबात चौधरी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाविष्ट व्हावे असे आम्हाला मनापासून वाटत होते. आज ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. चौधरी यांच्यासारखा कार्यकर्ता भाजपत आला त्यांचा व त्यांच्या समर्थकांचा भाजपत सन्मानच ठेवला जाईल त्यांनी किंतु, परंतु मनात न बाळगता पक्षात काम करावे. असेही सवरा म्हणाले

सर्व सत्तास्थाने मिळवण्याची संधी
या वेळी रजपूत म्हणाले, की लोकसभा, विधानसभा निवडणुका आमदार, खासदारांच्या होत्या. आत्ताची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आमदार, खासदार कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी तन, मन, धनाने काम करतील. आपणही पुढचे पंधरा दिवस झोपू नका आणि कुणाला झोपू ही देऊ नका. ही आपली आपल्याला मिळालेली चांगली संधी आहे. भारतीय जनता पक्ष पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची सत्ता निश्चित मिळवेल. काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल. त्यामुळे इतरांनी नाराज होण्याचे कारण नाही. आपण सत्ता नसताना लढलो आहोत. आता आपल्या हाती सत्ता आहे. त्यामुळे आपल्याकडे देण्यासाठी भरपूर पदे आहेत. ही पदे देऊन कार्यकर्त्यांचा निश्चित सन्मान करू.

राजपूत मोठ्या दिलदार मनाचे
या वेळी चौधरी म्हणाले, की मी पूर्वी वेगळ्या विचाराच्या पक्षात होतो, तरी तेथे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले. राजपूत व आमचा अनेकदा संघर्ष झाला; परंतु तो पक्षाच्या तत्त्वांसाठी संघर्ष होता. भरतभाई हे मोठ्या मनाचे आहेत. आम्ही भेटल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने हस्तांदोलन केले. आत्ताही आम्ही पक्षात यावे म्हणून त्यांचा प्रयत्न होता. पूर्वीच्या पक्षात ज्या निष्ठेने व प्रामाणिकपणे आम्ही काम केले त्याच निष्ठेने व प्रामाणिकपणे यापुढेही भाजपचे काम करू आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या जनतेच्या हिताच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवू. भाजप घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील. एका मोठ्या पक्षात प्रवेश घेताना मनावर थोडे दडपण होते; परंतु खा. सवरा यांनी मनावरचे हे दडपण दूर केले भरतभाई तर मनापासून आमच्याबरोबर जोडले गेले आहेत. पूर्वी मी विरोधी पक्षात असतानाही भरतभाई, खा. सवरा, प्रकाश निकम, हरिचंद्र भोये या सर्वांनी आम्हाला कधीही विरोधी पक्षाचे म्हणून वागवले नाही, तर उलट आम्ही दिलेल्या जनतेच्या योजनांसाठी त्यांनी निधी दिला आणि पक्ष भेद विसरून ते आमच्या कार्यक्रमाला हजर राहिले. आता तर आम्ही जनतेच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत एकत्र आलो आहोत. त्यामुळे अधिक जोमाने काम करू.
एकच सिंह, बाकी माकडे
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम म्हणाले, की डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीत भरतभाईंची उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी जाहीर होताच सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, यावरून भरतभाई यांची ताकद लक्षात येते. सिंह एकटा असतो, त्याच्या विरोधात किती माकडे एकत्र आली, तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे डहाणूची सत्ता हातात येणे आता केवळ औपचारिकता उरली आहे.
‘भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. विकासासाठी आम्ही लढतो आणि विकासाला लोक मतदान करतात हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे आता विकासकामांना लोक प्राधान्य देतात. विकासाच्या मुद्द्यावर आमच्याबरोबर आलेल्या नेत्या, कार्यकर्त्यांचा निश्चित सन्मान केला जाईल. त्यांना उपरेपणाची वागणूक मिळणार नाही, याची मी हमी देतो.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार, डहाणू

















