पालघर-योगेश चांदेकर
पालघरः ‘सन साई फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सवात नंडोरे देवखोप येथील महिलांचे देवी दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम संदीप पाटील राबवत असतात. या वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवला. या उपक्रमात दोनशे महिलांनी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. धार्मिक पर्यटनाच्या या उपक्रमाचे महिलांतून कौतुक होत आहे.
‘सन साई फाउंडेशन’च्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आपल्या सामाजिक उपक्रमातून संदीप पाटील यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या वेगवेगळ्या उपक्रमाची आता सर्वच क्षेत्रात दखल घेतली जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून संदीप पाटील हे नंडोरे येथील महिलांना नवरात्रौत्सवाच्या काळात वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जात असतात. वज्रेश्वरीसह अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून महिला धार्मिक पर्यटनाला जातात. त्यासाठी बसची व्यवस्था, नाष्टा, जेवण, चहा आदी सर्व व्यवस्था पाटील यांच्यामार्फत केली जात असते.

देवी दर्शनानंतरचा आनंद चेहऱ्यावर
धार्मिक पर्यटनाच्या मार्गावर महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी पाटील यांनी घेतली. या धार्मिक पर्यटनात सहभागी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर देवी दर्शनानंतरचा आनंद ओसंडून वाहत होता. धार्मिक पर्यटनातील सर्व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नीचे भरभरून कौतुक केले. केवळ नवरात्रीत महिलांचे धार्मिक पर्यटन यापुरते संदीप पाटील यांचे कार्य मर्यादित नाही, तर ते सातत्याने वेगवेगळ्या भूमिकातून कार्यरत राहतात.
माणसं जगवण्याचं समाधान
कोरोनाच्या काळात अनेकांच्या घरी जेवणाची व्यवस्था नव्हती. रोजगार नव्हता, अशा वेळी पाटील यांनी ‘सोहम फूड’च्या माध्यमातून घरोघर भोजनाची पाकिटे पाठवण्याची व्यवस्था केली. महिलांना रोजगार दिला. महिलांचे बचत गट स्थापन करून या बचत गटाच्या महिलांच्या हाताला काम दिले आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू विकण्याची व्यवस्था ही पाटील यांनी करून दिली. धार्मिक पर्यटनात सहभागी झालेल्या महिलांनी आवर्जून पाटील यांनी महिलांसाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली आणि देवीकडे त्यांच्या भल्यासाठी आशीर्वाद ही मागितला.

मदतीचा हात कायम पुढे
कोरोनानंतरच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. खाण्यापिण्याची भ्रांत तयार झाली. अशा वेळी संदीप पाटील यांनी केलेले काम आवर्जून लक्षात घ्यावे, असे आहे. समाजातील सर्वच समाज घटकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करायची आणि या हाताची मदत त्या हाताला कळणार नाही अशा पद्धतीने वागायचे, अशी पाटील यांची रीत आहे. युवकांसाठी वेगवेगळी क्रीडा शिबिरे घेणे, त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे, वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना, युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे अशी कामेही ते करत असतात. सध्याच्या ‘सन साई फाउंडेशन’ चे नाव पूर्वी ‘सन साई ग्रुप’ होते. या ग्रुपच्या माध्यमातून पावसाळ्याच्या काळात छत्र्यांचे वाटप तसेच पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा भरवणे अशी कामे त्यांनी केली.
कोट
‘सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण ही कामे करत असतो. महिलांना दरवर्षी नवरात्रौत्सवाच्या काळात देवीचे दर्शन घडवून एक प्रकारे नवदुर्गांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो.
संदीप पाटील, संस्थापक अध्यक्ष, ‘सन साई फाऊंडेशन

















