banner 728x90

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाहून पुढील आठवड्यापासून उड्डाण, या 10 शहरांसाठी सुरू होणार सेवा

banner 468x60

Share This:

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला गेल्या महिन्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) रूपात आणखी एक विमानतळ मिळाले आहे. आता या विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण सेवा सुरू होण्याचा क्षण जवळ आला आहे.

प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपासून हे विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

दोन प्रमुख विमान कंपन्या इंडिगो (IndiGo) आणि अकासा एअर (Akasa Air) येत्या 25 डिसेंबरपासून दिवशी देशातील आपली उड्डाण सेवा सुरू करणार आहेत. या विमानतळामुळे मुंबई महानगर क्षेत्राची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून एअरलाइन्ससाठी नवीन ऑपरेशन हबचा मार्ग खुला होणार आहे.

इंडिगो 10 शहरांना जोडणार

इंडिगो एअरलाइन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपल्या सेवांची सुरुवात 25 डिसेंबर पासून करणार आहे. या एअरलाइनने एकाच वेळी नवी मुंबईला 10 प्रमुख शहरांशी जोडण्याची घोषणा केली आहे. या शहरांमध्ये दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, नागपूर, जयपूर, कोची, मंगलूरु आणि नॉर्थ गोवा (मोपा) यांचा समावेश आहे. नवी मुंबई विमानतळामुळे जुन्या मुंबई विमानतळावरील कामाचा ताण विभागला जाईल आणि पश्चिम भारतातील वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, असे इंडिगोने म्हटले आहे.

अकासा एअरची दिल्लीसाठी सेवा

अकासा एअर देखील 25 डिसेंबर पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टप्प्याटप्प्याने आपले कामकाज सुरू करणार आहे. या विमानतळावरून दिल्ली आणि नवी मुंबई दरम्यान पहिले उड्डाण भरेल. त्यानंतर काही दिवसांतच ही एअरलाइन गोवा, कोची आणि अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू करेल. एअरलाइनने भविष्यात नवी मुंबई विमानतळावरून 300 देशांतर्गत आणि 50 आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रति आठवडा वाढवण्याची योजना आखली आहे.

अकासा एअरची मोठी योजना

आर्थिक वर्ष 2027 पर्यंत मध्य पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियासाठी आंतरराष्ट्रीय विस्तारासह 10 बेस स्थापित करण्याची आकाशाची योजना आहे. अकासा एअरचे को-फाउंडर आणि सीसीओ प्रवीण अय्यर यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पश्चिम भारतात एअरलाइनची सेवा आणखी मजबूत होईल. नवीन प्रवासी सेवा आणि नवीन मार्गांचा विस्तार करण्यास यामुळे मदत होणार आहे.

तिकीट विक्री देखील सुरू

एकूण 1160 हेक्टर परिसरात पसरलेल्या या आधुनिक विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला झाले होते. या टप्प्यासाठी 19,650 कोटी रुपये इतका खर्च आला असून त्यात एक टर्मिनल आणि एका धावपट्टीचा समावेश आहे. याची वार्षिक क्षमता 2 कोटी प्रवाशांची आहे. नवे विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीचा ताण कमी होईल आणि प्रवाशांना नॉन-स्टॉप उड्डाणांचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध होतील. 25 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सेवांसाठी एअरलाइन्सने तिकीट विक्री देखील सुरू केली आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!