मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका उदयास आली आहे. या महापालिकेने यंदा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
तर नवी मुंबईपेक्षा दहा वर्षे आधी निर्माण झालेल्या ठाणे महापालिकेने ६ हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करून दुसरा क्रमांक पटकावला.
गतवर्षी नवी मुंबईचा अर्थसंकल्प ठाण्यापेक्षा ६४ कोटी रुपयांनी अधिक होता, परंतु यंदा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४८३ कोटी रुपयांनी अधिक पुढे गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या भागातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी महापालिका असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आठ महापालिकांमध्ये सहाव्या स्थानावर घसरला आहे. सन २०१६मध्ये स्थापन झालेली आणि सर्वांत नव्या असलेल्या पनवेल महापालिकेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
या महापालिकेचा शेजार असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा, पालघर जिल्ह्यात एक आणि रायगड जिल्ह्यात एक अशा आठ महापालिका आहेत. ठाणे महापालिकेची स्थापना सन १९८२मध्ये झाल्याने ठाणे ही सर्वांत पहिली महापालिका आहे. पनवेल महापालिकेची स्थापना सन २०१६मध्ये झाल्याने ही सर्वांत नवी महापालिका आहे. या महापालिकांच्या अर्थसंकल्पाच्या आकारावरून या शहरांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
या सर्व महापालिकांचे २०२६-२७ या वर्षाचे अर्थसंकल्प नुकतेच जाहीर झाले. यामध्ये नवी मुंबई महापालिकेचा ६ हजार ७०४ कोटींचा अर्थसंकल्प सर्वांत मोठ्या आकाराचा असल्याने ही महापालिका आठ महापालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ठाणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ६ हजार २२१ कोटींचा असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प ४ हजार ८५३ कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नवी मुंबई आणि ठाण्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत…
नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नामध्ये जीएसटीच्या माध्यमातून सर्वाधिक १ हजार ८९७कोटी (४३%), मालमत्ता कर १ हजार २०० कोटी (२७%), नगररचना शुल्क ५४८ कोटी (१२.६४%), तर उर्वरित उत्पन्न पाणीपुरवठा, मुद्रांक शुल्क, गुंतवणुकीवरील व्याजसारख्या अन्य बाबींमधून येणारे आहे. ठाणे महापालिकेला जीएसटीच्या माध्यमातून १ हजार ६३३ कोटी (४०%), मालमत्ता कर १ हजार १२०.३७ कोटी (२७%), शहर विकास शुल्क ६६३ कोटी (१६%) येणार आहेत.
सुधारित अर्थसंकल्प ७ हजार कोटींचा
ठाणे महापालिकेने सन २०२५मध्ये ५ हजार ६४५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु प्रत्यक्षात सुधारित अर्थसंकल्प ७ हजार ८९ कोटींपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प ६ हजार २२१ कोटींचा असला, तरी भविष्यात येणाऱ्या उत्पन्नामुळे त्यामध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षांतील अर्थसंकल्प
महापालिका -स्थापना -अर्थसंकल्प २०२६ -अर्थसंकल्प २०२५ -अर्थसंकल्प २०२४
नवी मुंबई —१ जानेवारी, १९९२ —६ हजार ७०४ कोटी —५ हजार ७०९ कोटी —४ हजार ९५० कोटी
ठाणे —१ ऑक्टोबर १९८२ —६ हजार २२१ कोटी —५ हजार ६४५ कोटी —५ हजार २५ कोटी
पनवेल —१ ऑक्टोबर २०१६ —४ हजार ८५३ कोटी —३ हजार ८७३ कोटी —३ हजार ९९१ कोटी
मिरा-भाईंदर —२८ फेब्रुवारी २००२ —४ हजार ४६१ कोटी —२ हजार ६९४ कोटी —२ हजार २९७ कोटी
वसई-विरार —३ जुलै २००९ —४ हजार २९२ कोटी —३ हजार १९४ कोटी —३ हजार ११२ कोटी
कल्याण-डोंबिवली —१ ऑक्टोबर १९८३ —३ हजार १७९ कोटी —३ हजार ३६१ कोटी —३ हजार १८२ कोटी
उल्हासनगर —२० ऑक्टोबर १९९६ —१ हजार ५०४ कोटी —९८८ कोटी —९७७ कोटी
भिवंडी —१६ डिसेंबर २००१ —१ हजार १७९ कोटी —१ हजार ११७ कोटी —९५६ कोटी

















