नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे. मुंबईतील वाढती गर्दी आणि लोकसंख्या लक्षात घेता. नवी मुंबई हे नवे शहर वसवण्यात आले. आता नवी मुंबईतदेखील मोठ्याप्रमाणात विकासकामे होताना दिसत आहे.
काहीच दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील खुले होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतील व्यापाऱ्यात व आर्थिक उलाढालदेखील अधिक वाढ होणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र नवी मुंबईत ३०० एकरचे ‘इनोव्हेशन सिटी’ उभारत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नवी मुंबईत एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे आणि राज्य या सुविधेजवळ एक पूर्णपणे नवीन शहर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
राज्य नवी मुंबईत एक जागतिक क्षमता केंद्र ‘पार्क’ देखील उभारत आहे. अलीकडेच डेटा सेंटरवर २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणारे अनेक सामंजस्य करार केले आहेत आणि नवी मुंबईत एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारले जात आहे. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार असून ती जगभराशी जोडलेली असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पुढील काळात वाढणार असून राज्य सरकारने ‘गुगल’ शी शासकीय पातळीवर तंत्रज्ञान वापरण्याबाबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोक-यांचे स्वरुपही बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. टेक जायंट मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत राज्यातील १०,००० हून अधिक महिलांना एआयमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे.
नवी मुंबई विमानतळ कसे असेल?
नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलं आहे. 1,160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.