पालघर-योगेश चांदेकर
पालघरः प्रत्येक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरे केले जात असते; परंतु एखादी विशिष्ट ‘थीम’ निवडून त्यावर कार्यक्रम सादर करण्याचे आव्हान कुणीच स्वीकारत नाही. असे आव्हान स्वीकारून पालघरच्या एस. टी. कदम विद्यालयाने नवरसाच्या ‘थीम’वर एक अभिनव उपक्रम राबवून पालक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’वर या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभिनव ‘थीम’ची चर्चा आता पालघरमध्येच नव्हे, तर सर्वत्र होत आहे.
नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादरीकरण
तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नवरस ही ‘थीम’ घेऊन त्यावर विविध नृत्य, नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर केले. आनंद, दुःख, करुणा, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, विभक्त आणि शांत या नऊ रसांची प्रभावी व व भावनिक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
मुलीचा जीवन प्रवास उलगडला ‘थीम’मधून
नवरस या ‘थीम’चा मुख्य भाग एका मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित होता. तिच्या आनंदी बालपणानंतर ती कठीण प्रसंगावर कशी मात करते, समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या सहाय्याने ती कशी उभारी घेते, हे या वेळी नृत्य नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मोनोॲक्ट आणि नुत्यांद्वारे या भावनांना प्रभावीपणे सादर करून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
विद्यार्थ्यांचा सन्मान
या कार्यक्रमाची सुरुवात जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक कमल कचोलिया यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. या वेळी विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कदम परिवार आवर्जून उपस्थित
या वेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, व्यवस्थापक कोमल कदम, भावी मुख्याध्यापक प्रदीप पाणीग्रही, उपमुख्याध्यापक नेहा पाटील, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक संगीता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक आणि उपस्थितांची मनापासून मिळालेली दाद ही या शाळेसाठी एक अभिमानाची आणि चिरस्थायी बाब ठरली.