पालघर-योगेश चांदेकर
लाखो रुपयांच्या पारितोषिकांमुळे राज्यपातळीवर चर्चा
पालघरः ‘स्वरा युवा ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तारापूर एमआयडीसीतील ‘पालघर-डहाणू तालुका स्पोर्टस् असोसिएशन’ (पीडीटीएस)च्या मैदानात आयोजित आमदार चषक व ‘पीडीटीपीएल’ पर्व तीनच्या अंतिम सामन्यात राजकोटच्या ‘एलके स्टार’ संघाने रोमहर्षक लढतीत विजय मिळवला. या संघाला पाच लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
‘स्वरा युवा ग्रुप’चे संस्थापक तुषार संखे यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यात क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम आदींचा समावेश असतो. सामाजिक उपक्रमही ते राबवत असतात. दरवर्षी होणारी आमदार चषक स्पर्धा ही तर पालघर जिल्ह्यातील क्रिकेट संघ तसेच राज्यपातळीवरील विविध संघ आणि क्रिकेट प्रेमींसाठी जणू पर्वणीच असते.
लाखो क्रिकेट प्रेमींचा प्रतिसाद
दरवर्षी या स्पर्धेचा हजारो चाहते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊन आनंद लुटत असतात. या वर्षी सात ते ११ डिसेंबर दरम्यान झालेल्या या सामन्यात दररोज सुमारे ३५ हजार क्रिकेटप्रेमी प्रत्यक्ष हजेरी लावत होते, तर थेट प्रक्षेपणाचा लाभ सुमारे सहा लाख ७२ हजार क्रिकेट प्रेमींनी लाभ घेतला.
वीस संघ सहभागी
या स्पर्धेत वीस संघांनी भाग घेतला होता. त्यातील बारा संघ पालघर जिल्ह्यातील तर आठ संघ देश पातळीवरचे होते अंतिम सामना ‘बालाजी स्टार राजकोट’ व ‘एलके स्टार राजकोट’ या दोन संघात झाला. ‘बालाजी स्टार’ने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या ‘एलके स्टार’ संघाने ६६ धावा करून ‘बालाजी स्टार’पुढे विजयासाठी ६७ धावांचे आव्हान दिले.
अवघ्या एका धावेने विजय
या धावांचा पाठलाग करताना ‘बालाजी स्टार राजकोट’ संघाला ६५ धावा करता आल्या. अवघ्या एका धावेने या संघाचा पराभव झाला. या रोमहर्षक लढतीचा प्रेक्षकांनी आनंद लुटला. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून एजाज कुरेशी, उत्कृष्ट गोलंदाज राजीव मुखिया, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रथमेश ठाकरे, सामनावीर सुमित ढेकाळे हे ठरले. मालिका वीराला दुचाकी बक्षीस देण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाच्या ‘बालाजी स्टार’संघाला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
हे होते उपस्थित
या वेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, संजय पाटील, नीलम संखे, प्रशांत संखे, मुकेश पाटील आदी उपस्थित होते. सामने यशस्वीपणे पार पडण्यासाठी विवेक वडे, कुंजल संखे, प्रीतेश संखे, चिराग राणे, नितीन संखे, अनिकेत राऊत, पंकज पाटील, यतीन जाधव, बिपीन पाटील, अंकित पिंपळे, प्रसाद संखे, आदित्य संखे आदींनी परिश्रम घेतले.