पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर जिल्ह्यात रस्त्यांची, ‘जलजीवन मिशन’ची तसेच अन्य कामे निकृष्ट प्रतीची केली जातात. लाखो रुपये खर्च होऊनही चांगली कामे होत नसल्याने हे पैसे पाण्यात जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच संतापले. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घातले, तर अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या वेळी जिल्ह्यातील रस्ते बांधकाम तसेच अन्य कामाबाबत तक्रारी करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह अनेक इमारतींना तडे गेले आहेत. काही इमारती गळत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे न करताच पैसे काढण्यात आले आहेत, अशा गंभीर तक्रारीनंतर पालकमंत्री संतप्त झाले.
रस्त्यांची अवस्था दयनीय
वाडा तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून नवीन रस्त्यांवर केला जाणारा खर्च पाण्यात जातो. निंबवली पालसई मार्गावर नव्याने सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी केली, तेव्हा रस्त्याचे काम सुरू असताना दुसरीकडे रस्त्यात खड्डे पडल्याचे दिसत होते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. वाहनचालक ही संतप्त झाले होते. निंबोली गावापासून पालसई गावाकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी नव्वद लाख रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम निकृष्ट होते. रस्त्यावर दुसरा थर टाकला तर पहिला थर गायब होता.
खनिज वाहतुकीमुळे रस्ते खराब
या भागातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. याच मार्गावरून वसईच्या दिशेने अवजड वाहने जातात. अवजड वाहनांमुळे रस्ते खराब झाले आहेत. अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी व निंबवली ही तीर्थक्षेत्रे असून तेथे जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
महिनाभरात उखडला रस्ता
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत तलासरी तालुक्यातील सवणे सावरपाडा येथे दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता जेमतेम महिन्याभरातच उघडला. आदिवासी भागातील गावे रस्त्याने जोडली जावीत, म्हणून तयार करण्यात आलेले रस्ते निकृष्ट कामामुळे तसेच ठेकेदाराच्या मनमानीमुळे काही दिवसातच उखडतात. या कामाबाबत तक्रारी करूनही ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली
पालघर जिल्ह्यातील झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाबाबत थेट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदारांनी अभियान त्यावर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देश दिले होते, खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी वारंवार सांगूनही त्याबाबत दखल घेतली गेली नाही. पूर्वीच्या बैठकीत संबंधित कामाच्या ठिकाणी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचे फलक लावा, असे आदेश देण्यात आले असले, तरी पालघर जिल्ह्यात मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
रस्त्याच्या दर्जा तपासणीकडे दुर्लक्ष
रस्त्याच्या कामाचा दर्जा वेळोवेळी तपासण्याच्या सूचना असूनही अधिकारी या सूचनांचे पालन करत नाहीत. पालघर-बोईसर मार्गावरील भूमिगत पुलाचे कामही निकृष्ट प्रतीचे होते. याबाबत ग्रामस्थांनी थेट तक्रारी केल्या होत्या. वाडा तालुक्यातील मांडा, भोपिवली, खरिवली या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती केली नाही. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर रस्ता हाती घेण्यात आला; परंतु ठेकेदाराने नियमाप्रमाणे रस्त्याचे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ठेकेदाला जाब विचारात ग्रामस्थांनी रस्त्याचे कामच बंद पडले होते.
..तर बदल्या करून घ्या
पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासी उपयोजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पंतप्रधान सडक योजना व अन्य माध्यमातून रस्त्यांची कामे केली जातात तसेच जलजीवन मिशनची कामे केली जातात. जलजीवन मिशनची कामे निकृष्ट झाल्याने अनेक गावात पाणी मिळत नाही. जिल्हा परिषद इमारत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व अन्य सरकारी इमारतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. त्यांनी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना जमत नसेल, तर त्यांनी आत्ताच बदल्या करून घ्या. त्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी बजावले.