banner 728x90

Pahalgam Attack : महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचे पार्थिव आज मुंबईत, कोणत्या कोणत्या मंत्र्यांवर जबाबदारी?

banner 468x60

Share This:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारच्या सुमारास भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील तब्बल 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

या दुर्घटनेतील मृतांचे पार्थिव आज बुधवारी २३ एप्रिल २०२५ मुंबई आणि पुण्यात आणले जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

“पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगरहून एअर इंडियाच्या विमानाने दुपारी १२.१५ वाजता मुंबईत पोहोचेल. तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी ६ वाजता श्रीनगरहून पुण्यात आणले जाईल. तसेच हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन विमान दुपारी १.१५ वाजता श्रीनगरहून उड्डाण करेल आणि ते मुंबईत दाखल होईल. मुंबई विमानतळावर समन्वय साधण्यासाठी मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला रवाना होत आहेत. यासोबतच इतर पर्यटकांनाही सुरक्षितपणे परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोणत्या कोणत्या मंत्र्यांवर जबाबदारी?

तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दुपारी २.३० आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर उपस्थित राहतील. योगेश कदम हे मृतांच्या पार्थिवांना त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्याची व्यवस्था करतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः सर्व यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरला पोहोचली आहे. जेणेकरून तेथील पार्थिव आणि नातेवाईकांना विमानात बसवण्याची व्यवस्था करतील. मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश आहे. रविंद्र चव्हाण कालपासून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. ते डोंबिवलीतील तिन्ही पर्यटकांचे पार्थिव घेऊन डोंबिवलीला रवाना होणार असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत आहेत.

सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा

या दुर्घटनेनंतर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पहलगाममध्ये घडलेली घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. या हल्ल्याचे कुणीही राजकारण करू नये. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करायला हवा. संजय राऊतांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची गरज नाही. सरकार मृतांच्या नातेवाईकांसोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल”, असे आश्वासन दादा भुसे यांनी दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. “कुठलाही पक्ष किंवा गट न बघता सगळ्यांनी मिळून या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे. हिंदूंना धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यापूर्वीही अशाप्रकारे हिंदूंना लक्ष्य केले गेले आहे. दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे। जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे”, असेही सुनील आंबेकर यांनी म्हटले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!