पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर व डहाणू येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सापळा रचून विदेशी मद्याचे बॉक्स व एक वाहन जप्त केले. सात लाखांचे वाहन आणि 11 लाख 75 हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. प्रताप उदयसिंह (वय 26 रा. डांग समिसा, राजसंबंध, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात शेजारच्या दीव, दमण आणि सेलवासा या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होत असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी अनेकदा कारवाया करून विदेशी मद्याचे साठे जप्त केले. दीव, दमणमधून पालघरमार्गे महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेश व अन्य राज्यात अवैध मद्य जात असते.
गस्त पथकाची सापळा रचून कारवाई
मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके लक्ष ठेवून असतात. त्यासाठी कायमस्वरूपी गस्त पथके नेमण्यात आली आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख तसेच पालघरचे निरीक्षक अरुण चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आज गस्त घालून सेलवासा येथे विक्रीसाठी असलेली;परंतु तिथे विक्री न करता अन्य राज्यांत विक्रीसाठी कर चुकवून पाठवले जात असलेले विदेशी मद्य जप्त केले.
संशयावरून कारवाई
उत्पादन शुल्क विभागाने संशयावरून वाहन ताब्यात घेतले. त्यात दादरा नगर हवेलीसाठी विक्रीस असलेले विदेशी मद्याचे ११५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी ११५ बॉक्स ताब्यात घेतले. याशिवाय सात लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे वाहन व अन्य मुद्देमाल असा मिळून १६ लाख ७५ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. प्रताप उदयसिंहला अटक करण्यात आली आहे.
‘यांनी’ केली कारवाई
डहाणू आणि पालघर विभागाने केलेल्या या कारवाईत दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, राजेंद्र शिंदे, व्ही. के आबनावे, कमलेश पेंदाम, सत्यवान चोरघे, संदीप अहिरे, ओंकार शेजवळ आदींनी भाग घेतला. त्यांनी गाडीची झडती घेतल्याने त्यात लपवून ठेवलेले विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास विश्वजीत आभाळे हे करीत आहेत.
यांचे मार्गदर्शन
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक गणेश बारगजे, उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.