पालघर-योगेश चांदेकर
मूलभूत सोयी सुविधा नसल्याने बालकांच्या आरोग्याशी खेळ
पालघरः राज्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागामार्फत अंगणवाड्या भरविल्या जातात. या विभागाच्या स्थापनेला नुकतीच पन्नास वर्षे झाली असताना अंगणवाड्यांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरविण्याची तरतूद नसल्याने अंगणवाड्यांमध्ये विजेचा पुरवठा नाही तसेच शौचालयाची व्यवस्था नाही. उघड्यावर शौचाला जावे लागत असल्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना वीज, पाणी, शौचालय अशा सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. पालघर जिल्ह्यात २८०९ अंगणवाड्या सुरू आहेत. त्यातील फक्त पाचशेच्या आसपास अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा आहे. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये विजेची सोय नाही. शौचालय तर फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायतींकडून अपेक्षापूर्ती होणे अवघड
अंगणवाड्यांच्या स्वतःच्या इमारती नाहीत, तर ज्या ठिकाणी इमारती आहेत, त्या ठिकाणी वीज घेण्यासाठी तरतूद नाही. त्यामुळे अंगणवाड्यांच्या विजेची व अन्य मूलभूत सुविधांची व्यवस्था ग्रामपंचायतींनी करावी अशी अपेक्षा असते; परंतु ग्रामपंचायतींची आर्थिक क्षमता लक्षात घेता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायती अंगणवाड्यांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष देतात. विजेचे मीटर घेतले, तर वीजबिल कोणी भरायचे, असाही प्रश्न अनेकदा असतो.
दोन हजार अंगणवाड्यांनाच इमारती
एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प विभागाचे पालघर जिल्ह्यात १२ प्रकल्प असून, त्यासाठी तीन बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत. जिल्ह्यातील २८०९ अंगणवाड्यांपैकी २०५० अंगणवाड्यांना इमारती आहेत. यापूर्वी अंगणवाड्यांना इमारती नव्हत्या तसेच निधी उपलब्ध करण्यात अडचण येत होती; परंतु आता जिल्हा नियोजन व विकास निधीतून निधीची तरतूद होत आहे. त्यामुळे इमारतीची कामे होत आहेत. साडेतीनशे ते चारशे जागांचे प्रस्ताव तयार आहेत. अजूनही २५० अंगणवाड्या शाळांच्या इमारतीत भरतात, तर ३० ते ४० अंगणवाड्या खासगी इमारतीत भरतात. ६०० अंगणवाड्या इतरत्र भरतात. अंगणवाडीसाठी ग्रामीण भागात एक हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याची तरतूद आहे, तर शहरी भागात नियमानुसार तीन हजार रुपयांपर्यंत भाडे दिले जाऊ शकते.
दीड लाख जणांचा संबंध
पालघर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटातील सुमारे ८० हजार मुले आहेत, तर ० ते ५ वयोगटातील ७० हजार मुले तर गरोदर स्तनदा माता २० हजार, सॅम ६७ मॅम ९८९ अंगणवाड्यांशी संबंध आहे. मुख्य सेविका ६४ असून २८०९ अंगणवाडी मदतनीस आणि तितक्याच सेविका आहेत. आणखी पाचशे मदतनीस भरण्यास परवानगी मिळालेली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी अंगणवाड्यांच्या इमारती मोडकळीस आल्या असून त्या पडल्या, तर त्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आफताब हुसेन खान यांनी उपस्थित केला आहे.
साधे पिण्याचे पाणीही नाही
अंगणवाड्यांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. शौचालय नसल्याने लघुशंका किंवा शौचास उघड्यावर बसावे लागते. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बालकांना त्यांचा हक्क बालहक्क नियमानुसार मिळणे अपेक्षित असताना तो मिळत नाही, ही बाब आफताब हुसेन खान यांनी निदर्शनास आणून दिली आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाड्यांशी संबंधित अन्य घटकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, गरोदर मातांसाठी सोय करावी आदी मागण्या त्यांनी जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रवीण भावसार यांच्याकडे केल्या आहेत.
‘अंगणवाड्यांसाठी अजून वीज घेण्याबाबत शासन स्तरावरून तरतूद केलेली नाही. ग्रामपंचायतींनी विजेची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे.
-प्रवीण भावसार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, पालघर