banner 728x90

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, पेरणीच्या कामांना वेग..

banner 468x60

Share This:

पालघर जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील काही पूल पाण्याखाली गेले तसेच रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभराच्या पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतली.

चांगल्या पावसाने पेरणीच्या कामांना देखील वेग आला आहे.

पालघर जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु होता. मात्र सोमवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू आणि कासा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा, मनोर या अंतर्गत भागात पावसाचे चांगलाच जोर धरला. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत २४ तासात जिल्ह्यात ६३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला पावसाचा नारिंगी इशारा दिला असून काही भागात जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळनंतर दिवसभरात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने डहाणू तालुक्यातील गुलजारी आणि विक्रमगड तालुक्यातील देहर्जे या नद्यांना पूर आल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चारोटी-डहाणू, शीळ-देहर्जे, सारशी-सोलशेत, कुर्झे-कंचाड, विक्रमगड मनोर या रस्त्यांवरील पूल आणि साकव पाण्याखाली गेल्याने प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात येऊन वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तर पालघर मनोर रस्त्यावर नंडोरे येथे मोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ बंद पडली होती. रस्त्यातून झाड हटवल्यानंतर एका तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. दुपारनंतर किनारपट्टी भागात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला मात्र पूर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धामणी, कवडास, वांद्री, वाघ या धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली असून कवडास बंधाऱ्यातून १३१८८ क्युसेक्स वेगाने सूर्य नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असल्याने नदी, नाले आणि ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता असून नागरीकानी घराबाहेर पडताना तसेच वाहन चालवताना खबरदारी घेण्याची सुचना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.

चांगल्या पावसाने जिल्ह्यात शेतीच्या कामाने जोर धरला असून पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात हळव्या आणि गरव्या शेतीची ट्रक्टर आणि नांगराच्या मदतीने नांगरणी करून भाताची पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ७८६३६ हेक्टर क्षेत्रफळावर भात आणि नागलीची १२७७८ क्षेत्रफळावर लागवड केली जाते.सद्यस्थितीत भात २४६ हेक्टर आणि नागलीची २०८ हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी करण्यात आली असून दमदार पावसाने पुढील दिवसात पेरणीचा वेग वाढणार आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी :

वसई – १२.१ मिमी
वाडा – ४९.५ मिमी
डहाणू – १०७.७ मिमी
पालघर – ९६ मिमी
मोखाडा – २७.३ मिमी
तलासरी – १०८.९ मिमी
विक्रमगड – ७८.७ मिमी

पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेल्या गादी वाफ्याच्या चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील.वादळी वाऱ्याचा फळझाडांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता, नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. फळबागांमध्ये अतिरिक्त पाणी साचू नये म्हणून निचऱ्याची व्यवस्था करावी,.हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला असल्याने औषधं फवारणी व खते देण्याची कामे पुढे ढकलण्यात यावीत. – विलास जाधव, कृषी शास्त्रज्ञ व हवामान अभ्यासक, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!