पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी आयुष्य मंत्रालयाचे मंत्री तसेच आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आरोग्य राज्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून माहिती घेतली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने खा. डॉ. सवरा दिल्लीत असून ते विविध मंत्र्यांची वेगवेगळ्या प्रश्नावर भेट घेऊन चर्चा करीत आहेत. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रस्तावित २०० खटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांकडे केली.
जिल्हा रुग्णालयासाठी हवेत दीडशे कोटी
या प्रकल्पासाठी सुरुवातीला २०९ कोटी एक लाख ११ हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती; परंतु नंतर विविध कारणांमुळे काम प्रलंबित राहिल्याने तसेच सुधारित जीएसटी नियमामुळे अंदाजपत्रक वाढवून ते ३५७ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपये झाले. या प्रकल्पासाठी १४८ कोटी २८ लाख ८० हजार रुपये निधीची तातडीची गरज आहे. दोनशे खाटांचे रुग्णालय पालघर येथे झाल्यास रुग्णांना उपचारासाठी मुंबई, ठाणे किंवा गुजरातमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे डॉ. सवरा यांनी प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणले.
मंत्र्यांचा थेट आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क
आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. योग्य त्या उपाययोजना त्वरित राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आयुष केंद्राची मागणी
खा. डॉ. सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना पारंपरिक आणि समग्र वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांचा विस्तार व्हावा, यासाठी आयुष्य केंद्र स्थापन करण्याची मागणी केली. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, होमिओपथी प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळावे, त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी डॉ. सवरा यांनी आरोग्य राज्य मंत्र्याकडे केली. जाधव यांनी डॉ. सवरा यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या मागण्यांची तातडीने गंभीर दखल घेतली. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. सवरा यांच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य समस्या दूर झाल्या, तर नागरिकांच्या उपचाराची मोठी सोय होऊन त्यांना उपचारासाठी शंभर-दीडशे किलोमीटर प्रवास करण्याची वेळ येणार नाही.