पालघर-योगेश चांदेकर
मतदारसंघात दीड हजार कोटींची विकास कामे
पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचाच आमदार आहे. आता या वेळीही हा मतदार संघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच राहण्याची शक्यता असून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
तत्कालीन ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची पाळीमुळे रोवण्यात दिवंगत चिंतामण वनगा, विष्णू सवरा यांचे मोठे योगदान होते. आता त्यांची दुसरी पिढी राजकारणात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उमेदवार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यात लढत झाली होती. फार कमी मतांनी श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला.
पालघरमधून १२ इच्छुक, तरी वनगा आघाडीवर?
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. श्रीनिवास यांना नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पालघरमधून शिवसेनेची उमेदवारी दिली आणि ठाकरे यांनी दिलेली संधी वनगा यांनी सार्थ ठरवली. पालघर विधानसभा मतदारसंघात आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे १२ उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यातही हा मतदारसंघ भाजपला मिळावा, असा प्रयत्न होता. माजी खासदार राजेंद्र गावित यांचे तेथे पुनर्वसन करण्याचे घाटत होते; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांना साथ देणाऱ्या आणि सुरत, गुवाहाटी, पणजी, मुंबई असा प्रवास करणाऱ्या श्रीनिवास वनगा यांच्यासह अन्य आमदारांना उमेदवारी देण्याचे तीनही पक्षाच्या जागा वाटपात जवळजवळ मान्य झाल्यासारखे आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मागच्या वेळी दुपटीहून अधिक मतांनी विजय
पालघर विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी राजेंद्र गावित यांचा पराभव केला. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आणि ही जागा पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आली. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मागच्या वेळी त्यांनी काँग्रेसच्या योगेश नाम यांचा दुपटीहून अधिक मतांनी पराभव केला. आगामी विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या ठिकाणी दावा केला असला, तरी शिवसेनेचा शिंदे गट आणि शिवसेनेच्याच ठाकरे गटातील उमेदवारात लढत होण्याची शक्यता आहे.
हे आहेत इच्छुक
शिंदे गटातून वनगा यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या मनीषा निमकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदही वाढान यांची नावे चर्चेत आहेत, तर महाविकास आघाडीतून या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते, हे अद्याप ठरलेले नाही. शरद पवार गटाच्या ॲड. काशिनाथ चौधरी यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
सत्ताधारी आमदार असल्याचा फायदा
गेल्या अडीच वर्षात वनगा यांनी सत्ताधारी आमदार म्हणून पालघर जिल्ह्याच्या विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. पालघरचे रुग्णालय, क्रीडा संकुल तसेच अन्य प्रश्न मार्गी लागावेत म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. खासदार श्रीकांत शिंदे यांचे आणि श्रीनिवास वनगा यांचे चांगले संबंध आहेत. या संबंधाचा आणि मुख्यमंत्र्यांशी असलेल्या चांगल्या संबंधाचा वापर करून वनगा यांनी पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी गेल्या अडीच वर्षात सुमारे दीड हजार कोटी रुपये मिळवले आणि विविध विकासाची कामे मार्गी लावली. राज्यात वैशिष्ट्यपूर्ण आमदार म्हणून ज्या काही आमदारांची नावे घेतली जातात, त्यात वनगा यांचे नावही आवर्जून घेतले जाते.
मातीशी नाळ कायम
मातीशी नाळ न तुटलेला आणि अजूनही शेतीत राबणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने जमिनीवर राहून सामान्यांच्या प्रश्नात लक्ष घालणारे नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि विधानसभेचा गड त्यांनी सर केला, तर शिवसेनेची पालघरमधून हॅट्रिक होईल.
आदिवासींच्या हक्कासाठी रस्त्यावर
राज्यात धनगर समाजाचे अनुसूचित जमातीतील समावेशासाठी आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला विरोध करून, आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी वनगा यांनी सत्ताधारी पक्षाचे असूनही आपला ठाम विरोध केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती नेमली. या समितीच्या विरोधात राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जेव्हा संघर्ष केला, तेव्हा त्यात श्रीनिवास वनगा आघाडीवर होते. पेसा कायद्यातील भरतीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून पालघर विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांसाठीही निधी मिळवता आला. मोठमोठी विकासकामे करता आली, त्याचे समाधान आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली, तर आपण त्याचे निश्चित सोने करू.
-श्रीनिवास वनगा, आमदार, शिवसेना शिंदे गट, पालघर