पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पालघर जिल्हा पोलिस दल राज्यात पहिले आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या पोलिस दलाचे प्रमुख बाळासाहेब पाटील यांचे या यशाबद्दल खास अभिनंदन केले आहे.पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बाळासाहेब पाटील हजर झाल्यानंतर त्यांनी पालघर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले. या उपक्रमाची दखल थेट राज्य पातळीवर घेण्यात आली. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाची तसेच गेल्या वर्षात गुन्हेगारीची उकल करण्यात त्यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळविलेल्या यशाची दखल थेट गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी घेतली. डिसेंबरमध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर शंभर दिवसांसाठी संपूर्ण राज्यात सात कलमी कार्यक्रम राबवला. त्यात वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सुविधा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी विषयांवर भर देण्यात आला होता.
लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासक
पालघर जिल्हा पोलिस दलाने पोलिस प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करताना वेबसाईट अद्ययावत केली. ती ‘यूजर फ्रेंडली’ बनवली. नागरिकांसाठी सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम, ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित चॅट बॉक्स, स्वच्छता मोहीम, तक्रार निवारण कार्यप्रणाली, ‘व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यालयीन कामकाजामध्ये ‘एआय’चा वापर, गस्तीसाठी ‘थर्ड आय ॲपलिकेशन’ असे विविध उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले. सात कलमी कार्यक्रमांतर्गत पहिल्या पन्नास दिवसाच्या अंमलबजावणीचा आढावा राज्यातील पोलिस दलाने घेतला. या अंमलबजावणीत पालघर पोलिस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
यशात सर्वांचा हातभार
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी या सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी केली याचे सादरीकरण करण्यात आले. हा सात कलमी कार्यक्रम पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला असला, तरी हा कार्यक्रम राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाण्याचे निरीक्षक, ठाणे अंमलदार तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले या परिश्रमाचे चीज झाल्याची भावना बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली
पोलिसांच्या कामगिरीवर शाबासकीची थाप
पालघर जिल्हा पोलिस दलाने २०२४ या वर्षांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, बलात्कार अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलिस दलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. त्यामुळे पालघर पोलिसांवर शाबासकीची थाप पडत आहे. विधानसभेच्या निवडणुका तसेच लोकसभेच्या निवडणुका अतिशय शांतपणे हाताळण्यामध्ये पोलिसांची कामगिरी चांगली झाली. याशिवाय निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात विदेशी तसे बनावट मद्याचे साठे, वाहतूक, तस्करी उघडकीस आणण्याचे प्रमाणही जास्त होते.
दरोडे, खुनाचे सर्व गुन्हे उघडकीस
२०२४ मध्ये पालघर जिल्ह्यात खुनाचे ३५ गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून, त्यातील ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे हे प्रमाण शंभर टक्के आहे. जिल्ह्यात २८ दरोडे पडले, त्या सर्व २८ दरोडयांचा तपास पूर्ण झाला असून त्यातील ४७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाणही शंभर टक्के आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये १५७ घरफोड्या झाल्या. त्यातील ९८ गुन्हे उघडकीस आले असून १२८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण ६३ टक्के आहे.
सायबर गुन्हेमुक्त गाव मोहीम
पालघर पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात चांगली कामगिरी केल्यानंतर आता एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. देशभर सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून या गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या डिजिटल, मोबाईल, इंटरनेट व अन्य माध्यमांचा वापर सामान्य नागरिक ही करत आहेत. त्यात अनेक जण नेट बँकिंग, यूपीआय, फोन पे, जी पे असे पर्याय बँक खात्यांसाठी वापरत आहेत. अनेक जण मोबाईलवरच पासवर्ड व अन्य बाबी ठेवतात. त्यावर सायबर चोरट्यांचे बारकाईने लक्ष असते.
‘डिजिटल अरेस्ट’चे वाढते प्रकार
‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. केंद्रीय अर्थ मंत्रालय, ‘सीबीआय’, ‘सीआयडी’, प्राप्तिकर खाते अशा संस्थांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणूक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे आणि या दहशतवादाला सामान्य नागरिक बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा ‘सायबर गुन्हे मुक्त गाव’ हा एक भाग आहे.
गावोगाव जनजागृती
‘सायबर गुन्हे मुक्त गाव मोहिमें’तर्गत पालघर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे आपापल्या नियुक्तीच्या गावात जाऊन तेथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणार आहेत. सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे आणि वाईट चालीरीती याबाबत तयार करण्यात आलेली चित्रफीत सामान्य नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. याशिवाय अशा मोहिमेच्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांचे काही प्रश्न असतील, तर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न संबंधित अंमलदार आणि पोलिस अधिकारी करणार आहेत.