पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर येथील नवीन माहीम-मनोर हायवेवर असणाऱ्या क्रिस्टल पार्क, सिद्धांत सोसायटी, दीपमनी बिल्डिंग, राजवैभव बिल्डिंग यांचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे या भागातील नागरिकांना सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतो; शिवाय दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत आहे.
पालघर नगरपालिकेच्या गटारीची सुमारे ९९ लाख रुपयांची योजना असली तरी तिला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यातच क्रिस्टल पार्क, सिद्धांत सोसायटी, दीपमणी बिल्डिंग, राजवैभव बिल्डींग यांच्या रस्त्यालगत गटारी व्यवस्थित काढलेल्या नाहीत. या इमारतींचे सांडपाणी थेट रहदारीच्या रस्त्यावर येत आहे. एक वाहिनी टाकून तात्पुरते हे सांडपाणी अन्य गटारीत सोडता येणे शक्य आहे; परंतु त्याकडे नगरपालिका आणि बिल्डरांनीही दुर्लक्ष केले आहे.
सांडपाण्यामुळे दुर्गंधी
मलमिश्रित सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तसेच त्यामुळे या परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना आणि मुलांना या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतो. याबाबत गेल्या तीन वर्षांपासून वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेने त्याची दखल घेतलेली नाही. सातत्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने आणि ते जिरण्याची सोय नसल्यामुळे या भागातून जाताना नागरिकांना या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
सांडपाण्यामुळे साथीचे विकार
अनेकदा सांडपाणी रस्त्यातच साचत असल्यामुळे त्यातून मार्ग काढावा लागतो तसेच या सांडपाण्यातून अनेकदा वाहने जात असल्याने ते नागरिकांच्या अंगावर उडते; शिवाय अनेकदा या सांडपाण्यातून जात असताना वाहने घसरून अपघात झाले आहेत. या भागात सुमारे एक हजार लोक राहत असून त्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. पालघर नगरपरिषदने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीही इमारतीतून बाहेर पडणारे सांडपाणी अन्य दुसऱ्या सांडपाणी वाहिन्यांत जाण्याची सोय न केल्याने ते रस्त्यातच पसरते. या सांडपाण्यामुळे या भागात साथीचे आजार पसरतात त्यामुळे या भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोट
‘नवीन माहीम-मनोर हायवे लगतच्या क्रिस्टल पार्क, सिद्धांत सोसायटी, दीपमणी बिल्डिंग, राजवैभव बिल्डिंग यांचे सांडपाणी रस्त्यावर येत असून हे सांडपाणी अन्यत्र वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा. अन्यथा, या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल
विकी मधूकर संखे, उपतालुकाप्रमुख, युवासेना, पालघर
कोट
‘या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या मोटारीचा वापर सुरू आहे. तिथे उतार नाही. खासगी जागेतून वाहिनी टाकण्यासाठी त्यांच्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर कायमस्वरुपी तोडगा निघेल.
उमाकांत गायकवाड, मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद