पालघर-योगेश चांदेकर
संकटाच्या काळात देश एक संघपणे उभे राहत असल्याची भावना
पालघरः पहलगामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून तेथील लष्करी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराच्या या कारवाईचे अभिनंदन करून जनतेत योग्य तो संदेश जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पालघर येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तिंरगा यात्रेत खा. डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत भाजपचे नेते संजय पाटील, लक्ष्मीदेवी हजारी, विणा देशमुख, सुरेखा थेतले, पंकज कोरे, जगदीश राजपूत, सुशील औसरकर, महेंद्र भोणे, मिलिंद वडे, पुंडलिक भानुशाली, अशोक अंभुरे, भाविन कंसारा प्रणय म्हात्रे, देवानंद शिंगाडे, तेजराज हजारी, गौरव धोडी,सुमित पिंपळे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप जिल्हा कार्यालयापासून निघालेली ही यात्रा हुतात्मा चौक तेजराज हजारी यांचे कार्यालय अशी प्रवास करून आली. या यात्रेत जनतेने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
चीन, तुर्कस्तानच्या लष्करी सामुग्रीचे पितळ उघडे
या वेळी पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देश प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था सुधारत होती. अशावेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये घुसून २६ पर्यटकांची निर्घूण हत्या केली. या हत्यांचा बदला भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानमध्ये घुसून घेतला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्याचबरोबर पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन भारतीय सैन्याने हवेतल्या हवेत उडवून दिले. प्रतिकूल परिस्थितीत आणि संकटाच्या वेळी देश एकत्र असतो, हे यानिमित्ताने दिसले. संपूर्ण देश भारतीय लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे, हे दाखवून देण्यासाठी ही तिरंगी यात्रा काढण्यात आली होती. जनतेचा तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार
खासदार डॉ. सवरा म्हणाले, की भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने जे केले, ते जगाच्या नजरेसमोर आणण्याचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची पार्श्वभूमी जगाला सांगण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची निवड केली आहे. खासदारांशी चर्चा करून आता सर्वपक्षीय खासदार विदेशात जाऊन पाकिस्तानच्या कृष्णकृत्यांचा जगासमोर पर्दाफाश करणार आहे. पाकिस्तानच्या खरा चेहरा या निमित्ताने जगाला दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा भावनिक मुद्दा
या वेळी मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवताना ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भावनात्मक मोहीम कशी राबवली हे उपस्थितांना सांगून भरत राजपूत यांनी, ‘संकटाच्या काळात देशवासीयांनी धर्म, प्रांत, जात अशा भेदांना मूठमाती देऊन देशाने एकसंघपणे लष्कराच्या आणि सरकारच्या पाठीमागे उभे राहण्याची आवश्यकता आहे, ’असे सांगितले.