पालघर-योगेश चांदेकर
शेकडो महिलांचा पंचायत समितीत ठिय्या
पंधरा दिवसांत पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
पालघरः डहाणू तालुक्यातील विविध गावात अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच अनेक गावात पिण्याचे पाणी नसल्यामुळे महिलांना हंडे, कळशी घेऊन पाण्यासाठी धाव धाव करावी लागते. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने डहाणू पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.
महिलांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरी महिलांतील निवडक महिलांची एक समिती नेमून या समिती सोबत चर्चा करून पाण्याचा प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले.
घोषणांनी दणाणला परिसर
या आंदोलनाच्या काळात महिलांनी डहाणू पंचायत समितीचे कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. ‘पाणी आमच्या हक्काचे नाही. कुणाच्या बापाचे’, ’पाणी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशा घोषणा या महिला देत होत्या. डहाणू शहरातून पंचायत समितीवर आलेला मोर्चा स्थानिकांचे लक्ष वेधून घेत होता.
गढूळ आणि दूषित पाणी
महिलांनी आपल्या सोबत विविध गावांच्या पाण्याचे नमुने आणले होते. हे पाणी गढूळ आणि प्रदूषित कसे होते हे महिलांनी या वेळी संबंधितांना दाखवले. महिलांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समितीच्या आवारात झालेल्या सभेत जनवादी महिला संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या पाणीपुरवठा बाबतच्या धोरणावर सडकून टीका केली.
निकृष्ट कामे
डहाणू तालुका आदिवासी असून आदिवासी उपयोजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी येतो; परंतु योजनांची कामे निकृष्ट होतात. पाईपलाईन वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले खड्डे बुजवले जात नाहीत, अशा तक्रारी केल्या. यासोबतच महिलांनी डहाणू तालुक्यात धरणे करताना येथील स्थानिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले; परंतु आता या भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. धरणे उशाशी असताना कोरड घशाला पडली आहे, असे दाखवून दिले. विविध कूपनलिकांचे पाणी पिण्यायोग्य किंवा कपडे धुण्याच्याही लायकीचे नाही अशा तक्रारी या महिलांनी केल्या.
स्वप्न मोठी, योजना कागदावर
केंद्र सरकार भारताला जगात पहिल्या नंबरवर नेण्याचे स्वप्न दाखवते; परंतु स्वातंत्र्योत्तर काळातही आदिवासी भागातील पाण्याचे प्रश्न सोडवले जात नाहीत. येथील महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. ‘हर घर घर नल’ योजनेच्या माध्यमातून घरोघर नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखवले जाते; परंतु प्रत्यक्षात या भागात महिलांना हंडे घेऊन पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरावे लागते. गावागावात टाकीचे व विहिरीचे काम चालू असताना स्थानिक जागामालक शेतकऱ्याला विश्वासात घेतले जात नाही, झरे मोकळे करू दिले जात नाहीत, ठेकेदारावर कुणाचेही नियंत्रण नाही असे आरोप महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सदस्य लहानी दौडा, लता गोरखाना, मना गहला, मेरी रावते, नीलिमा माळी आदींनी केल्या.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समिती
या शिष्टमंडळाशी सहाय्यक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे, पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी बी. के. शिंदे तसेच डहाणूचे उपअभियंता महेश पाटील यांनी पाणीप्रश्नांबाबत चर्चा केली. त्यानुसार यापुढे विहिरीचे काम करताना स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घेतले जाईल, पाणी योजना ताब्यात देताना विहिरीचा गाळ साफ करून नंतर ती ताब्यात दिली जाईल, योजनेचे पाईपलाईन टाकताना खणलेल्या रस्त्यांची नंतर दुरुस्ती करून देण्यात येईल, कूपनलिकांच्या पाण्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे, की नाही याबाबत खातरजमा केली जाईल, अशा आशयाचे पत्र अधिकाऱ्यांनी या महिलांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. डहाणू शहरातून महिलांचा भव्य दिव्य असा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघाला असताना येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कुतूहलाचा तो विषय बनला होता. या आंदोलनाच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.