राज्यासह देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली जात आहेत. अशातच आता पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पुण्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित एका कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्यातील 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची माहिती दिली आहे, तसेच राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलताना म्हटले की, “प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा.”
घरांवर सोलर पॅनल बसवणार
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल.’ अशी माहिती दिली आहे. राज्यासह देशभरात गरजू लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. भविष्याचा विचार करुन ही घरे बांधली जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक घरावर सौर उर्जेसाठी पॅनल बसवले जाणार आहेत.
दरम्यान, पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव यशदाचे महासंचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.