banner 728x90

प्रकाश मरलेकडून जिल्हा परिषदेचीही फसवणूक; मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करणार

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर
दुसऱ्या व तिसऱ्या अपत्याच्या जन्म तारखेच्या नोंदीतही फरक
कारवाई टाळण्यासाठी दोन वर्षे अगोदरची जन्मतारीख दाखवण्याचा प्रयत्न

पालघरः ठाणे पालघर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत तिसरे अपत्य असल्याची माहिती दडवून दोनदा निवडणूक जिंकणाऱ्या प्रकाश मरले या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने केवळ पतसंस्था, सहकार खाते, निवडणूक आयोगच नव्हे, तर जिल्हा परिषदेची ही फसवणूक केल्याचे आता उघड झाले आहे. त्यांनी ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणांहून मिळवलेल्या दाखल्यातील तिसऱ्या अपत्याच्या नोंदीत फरक आहे. सेवापुस्तिकेत तर त्यांनी उघडउघड फसवणूक केली असून तिसऱ्या अपत्याची नोंदच केलेली नाही.
मरले यांनी यांनी दोन वेळा ठाणे पालघर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक लढवून ती जिंकली. सहकार कायद्यानुसार २००२ नंतर दोनहून अधिक अपत्य असतील तर सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येत नाही. निवडणूक लढवली असल्यास संबंधित सदस्याला अपात्र ठरविण्यात येते. याबाबत आता विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

banner 325x300

एक चूक लपवताना अनेक चुका
मरले यांच्या विरोधात तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीसोबत त्यांच्या तीनही अपत्याच्या जन्मतारखेचे दाखले जोडले आहेत. असे असतानाही मरले यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी धरमपूर ग्रामपंचायतीतून अपत्याचे दाखले काढले. तिसऱ्या अपत्याचा जन्म २००४ नंतर झाला आहे. तशा नोंदी कासा येथील जिल्हा परिषद शाळा आणि तिथल्या माध्यमिक शाळेच्या दाखल्यात आहे. एक चूक लपवण्याचा प्रयत्न करताना मरले यांच्याकडून आणखी गंभीर चुका झाल्या आहेत. शाळेतील दाखल्यावर २००४ चा जन्म असताना धरमपूर ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यात मात्र तिसऱ्या अपत्याचा जन्म २००२ चा दाखवला आहे.

सेवा पुस्तिकेत दोनच अपत्यांचा उल्लेख
जिल्हा परिषदेच्या सेवेत मरले आहेत. डहाणू पंचायत समितीकडे असलेल्या त्यांच्या सेवापुस्तिकेत तिसऱ्या अपत्याची नोंदच नाही. सेवा पुस्तिकेतील प्रतिज्ञापत्रानुसार आपल्याला तिसरे अपत्य असल्यास कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे मरले यांनी म्हटले आहे. मरले यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. सेवापुस्तिकेत त्यांनी पहिल्याच दोन अपत्यांच्या नोंदी दाखवल्या आहेत. तिसऱ्या अपत्याची मात्र नोंदच नाही. मरले यांच्या दुसऱ्या अपत्याच्या सेवा पुस्तिकेतील जन्माची नोंद आणि शाळेतील जन्मतारखेच्या नोंदीत एक वर्षाचा फरक आहे. सेवा पुस्तिकेतील दुसऱ्या अपत्याची नोंद २९ जून २०००, आहे तर त्याच अपत्याची नोंद पूर्वी शिकत असलेल्या शाळेत ती नोंद २८ जून २००१ आहे तर धरमपूर ग्रामपंचायतीच्या दाखल्यावर त्यांनी तिसऱ्या अपत्याची नोंद २९ मे २००२ केली आहे. याचा अर्थ मरले यांना दहा महिन्यातच अपत्य झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात तिसरे अपत्य २९ मे २००४ चे असतांना मरले यांनी कशा प्रकारे दाखल्यात खोटे फेरफार केले हे कागदोपत्री सिद्ध होत आहे.

संचालकपद राहण्यासाठी जन्मदाखल्यावरील तारखेत बदल
ठाणे पालघर शिक्षक पतपेढीच्या संचालकपदी राहण्यासाठी मरले यांनी कागदपत्रात फेरफार केले आहेत. मरले यांची मुले ज्या कासा येथील प्राथमिक, माध्यमिक आणि बोर्डी येथील शाळेत शिकली, तेथील दाखले तसेच धरमपूर ग्रामपंचायतीचा दाखला आणि सेवापुस्तिकेतील नोंदी पाहिल्या तर त्यात प्रचंड तफावत आढळून येते. याबाबत पत्रकार योगेश चांदेकर यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यातून हाती आलेली कागदपत्रे पाहता त्यात प्रचंड विसंगती आढळते. मरले यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याच्या जन्मतारखा वेगवेगळ्या ठिकाणी बदलल्या आहेत. दुसऱ्या अपत्याच्या बोर्डी येथील शाळेतील आणि सेवा पुस्तिकेतील नोंदीत एक वर्षाची तर तिसऱ्या अपत्याच्या शाळेतील आणि धरमपूर ग्रामपंचायतीतील नोंदीत दोन वर्षांची तफावत आहे.

विभागीय सहनिबंधकांकडून शहानिशा आवश्यक
याबाबत विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्यापुढे मरले यांच्या तिसऱ्या अपत्यप्रकरणी सुनावणी सुरू आहे. तेथेही तक्रारदार आणि मरले यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले आहेत. वास्तविक यातील कोणते दाखले खरे आणि कोणते खोटे याची शहानिशा भालेराव यांनी करायला हवी होती. आता २५ तारखेला ते काय निकाल देतात याकडे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीतून बोगस दाखले?
मरले यांनी सहकार खाते, निवडणूक आयोग, जिल्हा परिषद आणि ठाणे पालघर शिक्षक पतपेढीची फसवणूक केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीतून बोगस दाखले कसे दिले जातात, हे गेल्या दोन दिवसापूर्वीच्या वाघाडी ग्रामपंचायतीच्या प्रकरणातून निदर्शनास आले आहे. आता धरमपूर ग्रामपंचायतचे प्रकरणही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे?. जिल्हा परिषदेने बोगस दाखले देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. त्याशिवाय ग्रामीण भागातील बोगस दाखल्यांचे रॅकेट उद्‌ध्वस्त होणार नाही.

समिती नेमून चौकशीची मागणी
याप्रकरणी चांदेकर यांनी आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे कागदपत्रांशी पाठपुरावा केला असून शिक्षण विभागाची मरले यांनी केलेली फसवणूक निदर्शनास आणली आहे. पालवे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे मान्य केले आहे. मरले यांच्या वेगवेगळ्या प्रकरणातील फसवणूकप्रकरणी आता समिती नेमून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!