पालघर-योगेश चांदेकर
जिजाऊ संघटनेचा घेतला आधार
मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार
पालघरः विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रकाश निकम यांनी बंड केले असून जिजाऊ संघटनेच्या मदतीने ते विधानसभा निवडणुकीला जनतेला सामोरे जात आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून निकम नॉटरिचेबल होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ते संपर्कात आले असून, विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आणि ती जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुका त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून लढवल्या. त्यात त्यांना अपयश आले असले, तरी फारच कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आता गेल्या काही महिन्यांपासून निकम यांनी तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडावा, यासाठी महायुतीवर दबाव आणला होता भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तरी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची निकम यांची तयारी होती.
भाजपने दिलेला शब्द फिरवला
लोकसभेच्या निवडणुकीलाही त्यांनी जोरात तयारी केली होती; परंतु प्रत्येक वेळी त्यांना शब्द देऊन थांबवण्यात आले. ऐनवेळी हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे घेऊन हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिली. हा मतदार संघ आपल्यासाठी सोडला जात नसल्याचे पाहून कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची असा निर्धार निकम यांनी केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी, ‘कितीही दबाव आला तरी आपण माघार घेणार नाही. जनता जनार्दनाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे उभे राहू. आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत,’असे सांगताना जिजाऊ संघटनेचा संदर्भ दिला होता.
सांबरे विक्रमगडचे
जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे हे स्वतः विक्रमगड तालुक्यातील असून या भागातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर जिजाऊ संघटनेचे वर्चस्व आहे. याशिवाय जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून या भागात आरोग्य, शैक्षणिक व अन्य सुविधा मोठ्या प्रमाणात पुरवल्या जातात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निकम यांनीही या मतदारसंघात चांगले संघटन उभे केले आहे.जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या दोन्ही तालुक्यातील नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व असले, तरी हे वर्चस्व मिळवण्यात निकम यांचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेला सामोरे जाताना निकम यांच्याकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे तसेच जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांचे बळ आहे.
अधिक ताकदीने सामोरे जाणार
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पूर्वीच्या तुलनेत अधिक ताकदीने आणि संघटनात्मक जोर लावून ही अखेरची लढाई असल्याचे सांगून ते मैदानात उतरले आहेत. आपण कामदार आमदार होणार असून जनतेची मी निवडणूकीत उतरावे, अशी इच्छा होती, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा तसेच भाजपचाही माघारीसाठी दबाव होता; परंतु कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायचीच नाही, असा निर्धार त्यांनी केल्याने गेले काही दिवस ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही.
नॉट रिचेबल ते रिचेबल
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर निकम हजर झाले असून आता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेली गावनिहाय कामे, गावा-गावांत त्यांचा असलेला संपर्क, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतून मिळणारी मदत आणि जिजाऊ संघटनेची संघटनात्मक ताकद या आपल्या जमेच्या बाजू असल्याचे सांगून जनता जनार्दन या मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याबरोबर आहे, असा दावा त्यांनी केला. विक्रमगड जव्हार मोखाडा या तीन तालुक्यातील ग्रामपंचायत आणि नगरपालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद लक्षात घेऊनच या विधानसभा मतदारसंघावर निकम यांनी दावा केला होता. हा मतदारसंघ आपल्यासाठी सोडला नाही, तर महायुतीला तेथे पराभवाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यासाठी या मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रतिनिधींचे ६१ जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालायला गेले होते; परंतु त्याचा काहीच उपयोग न झाल्याने आता निकम यांनी ही निकराची लढाई सुरू केली आहे.
कामाची विजयात परिणती
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात केलेल्या विकासकामांची परिणती विजयात व्हावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. निकम यांचा मतदारसंघात दैनंदिन संपर्क मोठ्या प्रमाणात असून या संपर्काचा आणि जिजाऊ संघटनेच्या संघटनात्मक बळाचा फायदा होईल, असे त्यांना वाटते.
‘जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे यांचे या भागात मोठे काम आहे. त्यांची संघटनात्मक ताकद आहे. आरोग्य, शिक्षण, महिला, रोजगार तसेच अन्य बाबतीत त्यांनी केलेले काम आणि त्यांचे संघटनात्मक बळ यामुळे जनता निश्चित आपल्या पाठीशी राहील, असा विश्वास वाटतो.
–प्रकाश निकम, उमेदवार, जिजाऊ संघटना, विक्रमगड विधानसभा मतदारसंघ

















