पालघर-योगेश चांदेकर
बील काढण्यास मदत करणारा यांत्रिकी विभागाचाच कर्मचारी
चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह
पालघरः पालघर जिल्ह्यातील केळवा-माहीम पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी अभियंता प्रशांत इंगळे यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला चौकशी अधिकारी यांत्रिकी विभागगातील कर्मचारी असल्याने तत्कालीन उपअभियंता यांच्या मदतीनेच इंगळे यांनी पाच लाख रुपयांचे बिल काढले होते का? तसेच ठाकरे यांनी तत्कालीन उपअभियंता व त्यांचे सहकारी मित्र असलेले प्रशांत इंगळे यांना वाचवण्यासाठी किरकोळ ठपका लावला आहेका? असे प्रश्न आता अनुत्तरीत असून त्यामुळे आता या चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता ही चौकशी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
केळवा-माहीम पाणी योजनेतील पंप हाऊस मधील विद्युत उपकरणे तसेच कंट्रोल पॅनल स्टार्टर नवीन बसविणे अपेक्षित असताना तसे करण्यात आले नाही. मे २०२३ पासून ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम होणे अपेक्षित असताना ते न करताच इंगळे यांनी चार लाख ९४ हजार रुपयांचे बील काढले. हे बील काढण्यासाठी त्यांना त्यांचे यांत्रिकी विभागातील सहकारी तत्कालीन उपअभियंत्यांची मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकशीबाबत सुरुवातीपासून शंका
‘लक्षवेधी’ने केळवा-माहीम पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी चौकशी अधिकारी म्हणून ठाकरे यांची नियुक्ती केली. त्यानंतर ‘लक्षवेधी’ने इंगळे आणि ठाकरे यांच्यातील मैत्रीमुळे निपक्षपाती चौकशी होण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रत्यक्षात चौकशीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मैत्रीधर्माला जागून अहवालात बदल
ठाकरे या योजनेच्या पाहणीसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी पंप हाऊसमधील कंट्रोल पॅनल स्टार्टर बदलले नसल्याचे निदर्शनास आले. तेथील कर्मचारी प्रकाश वर्मा यांचा जाबजबाब आणि नोंदवहीतील नोंदी पाहून त्यांच्याही हा प्रकार लक्षात आला. ‘लक्षवेधी’ने संपर्क साधला असता इंगळे यात नक्की अडकतील, माझ्यावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र चौकशी अहवाल पाहिला असता त्यात केवळ अनियमितता दाखवून इंगळे यांना पाठीशी घातल्याचे दिसते. मैत्रीधर्म वाचवण्यासाठी अहवालात काही बदल केले का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आणि पाणी योजनेतील त्रुटी निदर्शनास आणल्या; परंतु ठाकरे यांनी जनतेच्या सेवेपेक्षा मित्रधर्म महत्त्वाचा मानला.
अहवालाची ग्रामपंचायतींची मागणी
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पंप दुरुस्ती आणि कंट्रोल पॅनल स्टार्टरचे कोणतेही काम झालेले नसल्याचे सांगितले असताना ठाकरे यांनी मात्र इंगळे यांनी कशाप्रकारे काम पूर्ण केले आहे, हे अहवालात नमूद केले आहे. केळवा-माहीम पाणी योजनेच्या पाणीपट्टी भरणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीना या अहवालाची एक प्रत पाणी पुरवठा विभागाने देण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. इंगळे यांना वाचविण्यासाठी आणि मैत्रीधर्म निभावण्यासाठी ठाकरे यांनी कशाप्रकारे अहवालात बदल केले, हे अहवाल मिळाल्यास पुढील ग्रामसभांमध्ये वाचन करण्यात येणार आहे.
ठाकरे यांच्या अहवालातील अनुत्तरीत प्रश्न
या प्रकरणामुळे योजनेची पाणीपट्टी स्वरूपात भरणा होणारी रक्कम यापुढेही अशाच प्रकारे अभियंत्यामार्फत लाटली जाणार का, असा गंभीर प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी असे प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. चौकशी अधिकारी ठाकरे यांनी पंप हाउस येथे पाहणी केली, तेव्हा त्यांना नवीन कंट्रोल पॅनल स्टार्टर आढळून आले का? त्यांनी त्याचे फोटो घेतले का? नवीन कंट्रोल पॅनल स्टार्टरचे खरेदीचे मे ते ऑगस्ट २०२३ या काळातील बील त्यांना मिळाले का? या काळात किती पंप दुरुस्तीला गेले? किती पंप दुरुस्त होऊन आले? या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी अहवालात दाखवणे गरजेचे होते. तेथील नोंदवहीत त्यांना कोणत्या नोंदी आढळल्या ? तेथील कंट्रोल पॅनेल स्टार्टर हे २०२१ साली बसविले आहेत का? या सर्व गोष्टी ठाकरे यांनी तपासल्या आहेत का, हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पालवे यांनीच चौकशी करावी
या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे यांनी वेगळी चौकशी समिती नेमून किवा स्वतः या कामाची पाहणी करून अपहार केलेल्या अभियंता प्रशांत इंगळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केळवा-माहीमसह १७ गावांतील नागरिकांनी केली आहे.