पालघर-योगेश चांदेकर
प्रकाश निकम यांच्यासाठी कार्यकर्ते आग्रही
पालघरः विक्रमगड- विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी व्हायचा असेल, तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह पदाधिकाऱ्यांतून केला जात आहे. त्यासाठी दबाव गटही तयार झाला आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विष्णु सवरा यांच्याकडून युती नसताना निकम यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. तर विक्रमगड मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभेत डॉ हेमंत सवरा यांचा युती असताना २१ हजार पेक्षा जास्त मतांनी सुनील भुसारा यांनी पराभव केला होता,
महायुतीच्या विजयासाठी निकमच हवेत
गेल्या दोन निवडणुकीचा अनुभव तसेच त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निकम यांनी केलेली गावनिहाय कामे आणि गावोगाव त्यांचा असलेला संपर्क यामुळे या मतदारसंघातून महायुतीला विजय मिळवायचा असेल, तर निकम यांच्यासारख्या नेतृत्वाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.
नगरपंचायत, पंचायतसमिती,ग्रामपंचायतीत वर्चस्व
या आग्रहासाठी त्यांनी जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील कोणकोणती सत्तास्थाने कोणा कोणाच्या ताब्यात आहेत, याचा संदर्भ दिला आहे. मोखाडा तालुक्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समीती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, तर सुमारे ८०% ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सरपंच आहेत. याशिवाय जव्हार तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटापैकी १ गट शिंदेच्या शिवसेनेकडे तर १ गट भाजपकडे तर १ गट अजितपवार गटाकडे आहे. तर जव्हार नगरपरिषद ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तसेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा १ गट पंचायत समितीचा १ गण शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, आणि विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊचा झेंडा असला तरी १ नगरसेवक तसेच नंबर २ च्या मतांची संख्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. या तालुक्यातही बऱ्याच ग्रामपंचायतीही ताब्यात आहेत.
मतदारसंघ न सोडल्यास पराभवाची पुनरावृत्ती
विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत सवरा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते; परंतु त्या वेळी ते त्यांचा पराभव झाला , असे शिंदे गट निदर्शनास आणतो. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व कसे आहे आणि शिंदे गटाला डावलून हा मतदार संघ महायुतीतील अन्य पक्षाकडे गेल्यास पराभवाची पुनरावृत्ती कशी होऊ शकते, याचे दाखले कार्यकर्त्यांनी दिले आहेत.
महायुतीत दबावाचे राजकारण
शिवसेनेचा शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडणे कसे आवश्यक आहे, यासाठी आणि प्रकाश निकम हेच या मतदारसंघातून महायुतीला कसा विजय मिळवून देऊ शकतात, हे पटवून देण्यासाठी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यास जाणार असून महायुतीच्या जागावाटपत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटालाच कसा सोडला जावा, यासाठी आग्रह राहणार आहे. महायुतीत अनेक मतदारसंघासाठी दबावाचे राजकारण सुरू असते तसेच दबावाचे राजकारण आता विक्रमगड विधानसभा मतदारसंघातही सुरू झाले आहे.
निकम यांच्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न
कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मिळाला पाहिजे, यावर आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भर आहे. हा मतदारसंघ केवळ प्रकाश निकम यांच्यासाठी सोडला जावा आणि त्यांनी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील केलेल्या विकासकामांची परिणती विजयात व्हावी, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होता; परंतु ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढून घेऊन तो भाजपने ताब्यात गेला. त्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असता, तर निकम हे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; परंतु हा मतदारसंघ त्या वेळी भाजपला गेल्याने निकम यांना थांबावे लागले. या परिस्थितीत किमान आता तरी त्याच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा असा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे.
निकम यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध
निकम यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याने तसेच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस असल्याने या परिस्थितीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यातून महायुतीकडे आणण्यासाठी प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची मोठी ताकद आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गट सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे शिंदे गटाकडे असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला आणि त्यातही उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांना सोडावा, अशी आमची सर्वांची आग्रही मागणी आहे.
–रिकी रत्नाकर, युवासेना लोकसभा प्रमुख पालघर