पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर पडलेले खड्डे, काँक्रीटीकरणाचे निकृष्ट काम, उड्डाणपुलाची अपूर्ण कामे यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. वाहतुक कोंडी तर रोजची असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. हेमंत सवरा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करून त्यांना कामासंबंधी सूचना केल्या. लोकांना दिवाळीला तरी व्यवस्थित घरी जाता यावे, यासाठी काय नियोजन करायचे ते करा, असे त्यांनी बजावले.
मुंबई-अहामदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. नांदगाव, जव्हार फाटा आणि सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे नांदगाव फाटा ते सातिवली दरम्यानच्या सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गुजरात मार्गिकेवर ढेकाळे वाघोबा खिंड, तर मुंबई मार्गीकेवर चिल्हार फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट
मस्तान नाका,जव्हार, टेन नाका, वरई फाटा आदी वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला बसतो. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामात महामार्ग वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि मनोर पोलिस यांच्याशी याबाबत सवरा यांनी चर्चा केली.
ठेकेदाराचे दुर्लक्ष
नांदगाव फाटा आणि जव्हार फाटा उड्डाणपुलांचे काम करणाऱ्या आर. सी. पटेल या ठेकेदारांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी ट्राफिक वार्डन नेमले जात नाहीत तसेच सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे.त्यामुळे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासाला तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे.
अंतर्गत रस्त्यांचा श्वासही कोंडलेला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर-विक्रमगड रस्ता, वाडा-मनोर रस्ता, मनोर-पालघर रस्ता आणि वरई-पारगाव रस्त्यासह वरई फाट्यावरून पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या तसेच दहिसर-बहाडोली दरम्यानच्या अरुंद पुलावर वाहतूक मोठी कोंडी होत आहे. पुलाच्या दहिसर बाजूला वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात. सिग्नल यंत्रणा कोलमडून पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या वाहन चालकांवर स्वतः वाहतूक नियंत्रणाची वेळ येते.
पुलाला भगदाड
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कायम वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या पूलाच्या दुरुस्तीची होत होती; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
‘खानिवडे पथकर नाका येथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार तसेच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जनतेला दिलासा देण्याबाबत प्रयत्न केला जाईल.
-डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर