पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्ह्यातील असंपर्कित गावे रस्त्याने जोडणार
पायाभूत विकासकामे चांगली न करणाऱ्यांवर कारवाईचा आग्रह धरणार
पालघरः लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नव्हते. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक विकासाची कामे केली. महायुतीने गेल्या अडीच वर्षात विकासाची घौडदौड सुरू ठेवली आहे; परंतु विरोधी पक्ष खोटे बोल; पण रेटून बोल या वृत्तीने वागत असून त्यांचा हा प्रचार आता जनतेच्या लक्षात आला असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत हे चालणार नाही, असे स्पष्ट मत खा. डॉ. हेमंत सावरा यांनी व्यक्त केले.
डहाणू येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावरा यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करून त्या आधारे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे जाहीर केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, माजी आमदार अमित घोडा, मधुकर भोये, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, जगदीश राजपूत, संदीप पावडे, लुईस काकड, निमिल गोहेल,प्रशांत संखे,अशोक अंभुरे,विशाल नांदलसकर, संतोष चोथे, सुशील औसरकर, पुंडलिक भानुशाली, गौरव धोडी नंदन वर्तक,आदी उपस्थित होते.
१६५ असंपर्कित गावे संपर्कात आणणार
पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांबाबत माहिती देताना डॉ. सवरा म्हणाले, की पंतप्रधान आवास योजनेतून पालघर जिल्ह्यात ६८ हजार घरांना मान्यता देण्यात येणार आहे. आठवडे बाजार योजना ही मंजूर झाली आहे. पालघर जिल्ह्यात मुंबई क्षेत्र प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रेल्वेच्या अनेक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यासाठी भरीव काम करीन, असा मला विश्वास आहे. मोखाडा येथील दुर्घटना लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील असंपर्कित १६५ गावे रस्त्यांनी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरला आहे. राज्य सरकारने या कामांसाठी निधी द्यावा, यासाठी पाठपुरावा करू. राज्य सरकारचा निधी कमी पडल्यास केंद्र सरकारकडून त्यासाठी निधी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
कामे दर्जेदार न केल्यास कारवाई
राज्य सरकार व केंद्र सरकार विविध कामांसाठी भरपूर निधी देते. विशेषता ज्या योजना राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत राबवल्या जातात, त्या रस्त्यांची किंवा योजनांची तसेच अन्य पायाभूत सुविधांची विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी आमचा आग्रह आहे. पैशासाठी काही अडणार नाही. फक्त या पैशाचा योग्य विनियोग होऊन रस्ते दर्जेदार व्हावेत, असा आग्रह आहे. रस्ते किंवा अन्य पायाभूत विकास कामांमध्ये अनियमितता, निकृष्टता आढळल्यास या सर्व कामाच्या चौकशीचा आग्रह आपण धरू. यासोबत संबंधितांवर कारवाई होण्यासाठी अखेरपर्यंत पाठपुरावा करू, असा इशारा त्यांनी दिला.
तक्रारींचा निपटाराच नाही
पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागात तक्रारी दाखल झाल्या आहेत; परंतु या तक्रारींवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांचा निपटारा केला जात नाही. यासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची सूचना पत्रकारांनी केल्यानंतर डॉ. सावरा यांनी याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य संबंधितांशी बोलून त्यावर निर्णय घ्यायला भाग पाडू, असे सांगितले. विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात आग्रह धरू. महिलांसंबंधीचे तक्रार निवारण कक्ष बंद झाले असल्यास ते पूर्ववत सुरू करण्यापासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. देशात चार कोटी दहा लाख युवकांना पाच वर्षात कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी विविध पाचशे कंपन्यांनी युवकाना नोकरी दिल्यास त्या कंपन्यांना पहिल्या महिन्याचा पगार तसेच भविष्य निवार्ह निधीसाठी मदत करण्याचे जाहीर केले आहे. प्राप्तिकर दात्यांना प्रमाणित वजावटीत वाढ, कराच्या स्लॅबमध्ये बदल असे निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सवरा म्हणाले.
पाच कोटी आदिवासींसाठी ग्रामोन्नती योजना
आदिवासी भागासाठी ग्रामोन्नती योजना तयार करण्यात आली असून ६३ हजार गावातील सुमारे पाच कोटी लोकांना फायदा होणार आहे. पारंपरिक कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. एक कोटी गरीब लोकांना घरे देण्यात येणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही विकासाच्या योजना घेऊन सामोरे जाणार असल्याचे सांगून त्यांनी लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. बळीराजाला मोफत वीज देण्यासाठी साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्यात येणार आहे. ५५ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती डॉ. सावरा यांनी दिली.
दहा लाख युवकांना रोजगार प्रशिक्षण
महाराष्ट्र सरकारने युवकांना कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. त्यासाठी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून त्याचा फायदा सुमारे दहा लाख युवकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मुलींना पदवी किंवा पदविकापर्यंत मोफत व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर वारीतील दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याच्या योजनेची माहिती डॉ. सावरा यांनी दिली.
खोटे बोल;पण रेटून बोल ही विरोधकांची नीती
देशात एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांच्या हाती सत्ता दिली; परंतु महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांचा खोट्या कथानकांचा महायुतीला फटका बसला. आता विधानसभेला विरोधक असेच खोटे कथानक घेऊन येणार असले, तरी जनतेला चूक लक्षात आली असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या खोटे बोल पण रेटून बोल ही नीती चालणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.