कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे.
तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
इंडियन पोलीस फाउंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त “भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे.
पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनीय बाब असून, पोलीस दलात आणखी चांगले बदल घडविण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचार मंथन महत्वपूर्ण ठरतील. यातून येणारे नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल. पोलीस दल तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नकारात्मकता कमी होते आणि राज्य व देश शाश्वत प्रगतीकडे वाटचाल करू शकतो.
गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे. इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे. एआयच्या सहायाने गुंतागुंतीचे गुन्हे प्रकरणे अधिक वेगाने सोडविण्यात मदत होत आहे.आज अमली पदार्थांची गुन्हेगारी पोलीस दलासमोर एक आव्हान आहे. यामध्ये झिरो टोलरन्स असणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉमद्वारे गुन्हेगारी वाढत असून, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल ट्रॅकिंग, ऑनलाईन गुन्ह्यांवर जदल प्रतिसादासाठी विशेष असे नव तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे आवश्यक आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच शाश्वत मूल्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न होणेही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

















