महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी आज एका तातडीच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.
या पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं आणि सर्वसामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
हिंदी भाषेबाबत ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
राज्य सरकारने पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे, ही एक महत्त्वाची घडामोड आहे. मात्र, पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या नवीन निर्णयावर राज ठाकरे काय भूमिका घेतात किंवा काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘पहिलीपासून हिंदी सक्ती’चा निर्णय मागे घेतल्यानंतरही ‘पाचवीपर्यंत हिंदी तृतीय भाषा’ म्हणून कायम ठेवल्याने राज ठाकरे यावर काय भाष्य करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फडणवीस भेटीवर खुलासा करणार?
या पत्रकार परिषदेत सर्वांत उत्सुकतेचा विषय म्हणजे, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट. या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या भेटीतील चर्चेचा खुलासा राज ठाकरे करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पक्षाची राजकीय भूमिका करणार?
राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीतून भाजप आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती किंवा आगामी निवडणुकांमध्ये जागावाटपावर काही महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेद्वारे राज ठाकरे त्यांच्या पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करतील अशीही अनेकांची अपेक्षा आहे.