पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळण्याची शक्यता
राज्यात राजकीय पुनर्वसन जोमात
पालघरः महायुतीचे सरकार राज्यात येत असताना मंत्रिपदाची रचनाही जवळजवळ निश्चित झाली आहे. त्यात पालघर जिल्ह्यातून राजेंद्र गावित यांची मंत्रिपदी निवड निश्चित मानली जात असून पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीचा मागच्या सरकारमध्ये पालघर जिल्ह्यातून कोणालाही मंत्रिपद दिले गेले नव्हते. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार होते, तर एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, एका विधानसभा मतदारसंघात माकप आणि एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार होता. त्यात श्रीनिवास वनगा यांनी निवडून आल्यानंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले. सुनील भुसारा, वनगा आणि विनोद निकोले हे तिघेही पहिल्यांदाच निवडून आलेले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातून एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते.
महायुतीला चांगले यश मिळाल्याने आता जिल्ह्याला मंत्रिपद
या पार्श्वभूमीवर या वेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने सहा पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. त्यात निवडून आलेले तीन आमदार पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करीत आहेत, तर विलास तरे यांनी यापूर्वी एकदा बहुजन विकास आघाडीतून विजय मिळवला होता. या वेळी ते शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विधानसभेवर निवडून आले आहेत. या पाचही आमदारात आ. गावित हे सर्वात वरिष्ठ असून त्यांना मंत्रिपदाच्या कामांचा अनुभव आहे. ते राज्यमंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर ते दोनदा खासदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
राजकीय पुनर्वसनात मंत्रिपदही
गावित हे कोणत्याही पक्षात असले, तरी पालघर जिल्ह्यावर त्यांचे वर्चस्व असून ते निवडून येतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आली, तेव्हा त्यांना राज्यात चांगले पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार गावित यांना पालघरमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि प्रचंड मतांनी त्यांनी विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या मंत्रिमंडळाची रचना होत असताना गावित यांची मंत्रिपदी निश्चितपणे वर्णी लागू शकते. त्याचे कारण त्यांनी अनेकदा पक्षांतरे केली असली, तरी त्यांचे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यातही महायुतीच्या विजयात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी गावित यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. या संबंधांमुळे तसेच पालघर जिल्ह्यात अजात शत्रू म्हणून त्यांची ओळख असल्याने गावित यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
चव्हाण यांची परंपरा पुढे नेणार
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रवींद्र चव्हाण यांनी अडीच वर्षे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद म्हणून काम पाहिले. त्यांनी पालकमंत्री म्हणून समन्वयाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे महायुतीलाही पालघर लोकसभा मतदारसंघात आणि पालघर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात यश मिळाले. आता त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी गावित यांच्यावर आहे. पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांची असलेली जाण, अधिकाऱ्यांबरोबर असलेले संबंध आणि समन्वयाची भूमिका यामुळे गावित हे मंत्रिपदावर आपला ठसा उमटवतील याची खात्री नेतृत्वाला असल्यामुळे त्यांची मंत्रिपदी निश्चितपणे लागेल, असा विश्वास गावित यांचे समर्थक व्यक्त करतात.