पालघर-योगेश चांदेकर
पालघर: शासन स्तरावरून मानव विकास शिबिरे भरवण्यासाठी दिल्या जात असलेल्या निधीचा डहाणू तालुक्यात गैरप्रकार झाला असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी पाच दिवसात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देणार आहेत.
मानव विकास शिबिरे भरवणाऱ्या संस्थेला अनुदानाची रक्कम न मिळता ती परस्पर डहाणू तालुक्यातील उपसरपंचाच्या भावाने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लाटली. हा प्रकार ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणला. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले.
आर्थिक लेखापरीक्षण होणार
आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी डहाणू तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात मानव विकास शिबिराच्या आयोजनासाठी आलेल्या निधीत कसा गैरप्रकार झाला याची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आर्थिक लेखापरीक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीधर वायडा यांनी बँक खात्याच्या तपशीलासह डहाणू तालुक्यातील आशागड, गंजाड, तवा आणि ऐना या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ लाख ३६ हजार रुपयांचा कसा गैरव्यवहार झाला याचा तपशील दिला होता.दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी आलेल्या निधीत अशा प्रकारे गैरव्यवहार होत असून प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्यानेच हे सर्व प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.
उपसरपंचाचा भाऊ आणि वैद्यकीय अधिकारी गोत्यात
शासन स्तरावरून आलेला निधी वास्तविक मानव विकास शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थेच्या खात्यात जमा व्हायला हवा होता; परंतु तसे न होता हा निधी गंजाडच्या उपसरपंचाचा भाऊ गणेश कामडी यांच्या खात्यावर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यामुळे त्यात साशंकता निर्माण झाली आहे. ही शिबिरे ‘स्मता फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. औषधे व अन्य खर्चही याच संस्थेने केला; परंतु या संस्थेशी काहीही संबंध नसलेल्या किंवा या संस्थेचा पदाधिकारी नसलेल्या व्यक्तींच्या नावे थेट बँकातून निधी जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा निधी जमा करण्याचे आदेश संबंधित तालूका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले. हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे.
आरोग्यसेवेचा बोजवारा, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या प्रकरणी आता डॉ. करण धांडे, डॉ. आदिती भानुशाली, प्रदीप अरुण मोहिते, गणेश कामडी यांच्यासह ‘लाईफ लाईन एंटरप्राईजेस’ची ही चौकशी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे यांच्या आदेशानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सोयीसुविधा नाहीत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय कर्मचारी अनेकदा रुग्णालयात उपलब्ध नसतात अशाही तक्रारी वाढल्या असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
बाल आणि मातांच्या मृत्यूचे प्रमाण जादा
गेल्या आठवड्यातच वेळेवर उपचार न मिळाल्याने एका महिलेचा तसेच बालकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात चार हजारावर अधिक बालकांचा तसेच चारशेहून अधिक महिलांचा मृत्यू झालेला असतानाही आरोग्य विभाग मात्र अद्याप कोणतीही बाब गांभीर्याने घेत नाही. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सलाईनवर असल्याची परिस्थिती असतांना जिल्हा आरोग्य विभाग मात्र या सर्व बाबतीत उदासीन असल्याचे चित्र असून उलट आदिवासी उपयोजनेतून पालघर जिल्ह्याला अधिक निधी मिळत असतानाही या निधीचा योग्य विनियोग होत नसल्याचे समोर आले आहे.
खासदारांकडून दखल; परंतु अधिकारी अनभिज्ञ
पालघरमधील आरोग्य सेवेबाबत असलेल्या गंभीर तक्रारीबाबत खा. डॉ. हेमंत सावरा यांनी पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे निर्देश देऊन या गंभीर प्रश्नांबाबत बैठक घेऊन समंधीत विभागाची कानउघडणी केली खासदारांना आरोग्य सेवेतील गांभीर्य लक्षात येत असताना पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाला आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मात्र त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आरोग्य विभागातील अनेक गैरव्यवहार आणि गंभीर प्रकार गेल्या काही दिवसात उघड झाले असतानाही आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन काय करते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘लक्षवेधी’ने मात्र आरोग्य विभागातील गैरव्यवहारांचा पर्दाफाश केल्यामुळे आता आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे.
जिल्हाभर चौकशीची गरज
मानव विकास शिबिराच्या निधीतील गैरप्रकार फक्त डहाणू तालुक्यापुरते मर्यादित आहेत, की जिल्हाभर असे प्रकार चालतात, याबाबत आता एक समिती नेमणूक चौकशी करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषद हे पाऊल उचलणार का, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.