चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोर धरून होती. पण रोहितने मी वनडेमधून निवृत्त होत नसल्याचे सांगितले.
दोन वेळा टी-२० विश्वचषक आणि दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माला अजूनही एकदिवसीय विश्वचषक जेतेपदाची प्रतिक्षा आहे. सुमारे १० महिन्यांत दोन विजेतेपदे जिंकल्यानंतर, रोहितला आता २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार का? यावर रोहितने उत्तर दिलं आहे.
दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने त्याच्या भविष्याबाबत वक्तव्य केलं. या स्पर्धेपूर्वी आणि विशेषत: अंतिम सामन्यापूर्वी, ही त्याची शेवटची स्पर्धा आणि शेवटचा सामनाही असू शकतो, असे मानले जात होते. पण रोहितने या अफवांवर पूर्णविराम लावला आणि नंतर २०२७ च्या वर्ल्डकपबाबत वक्तव्य केलं.
सध्या, रोहित २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही याबद्दल त्याने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयसीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहितने स्पष्ट केले की, सध्या असा दावा करणे त्याच्यासाठी कठीण आहे.
रोहित शर्मा म्हणाला, “सध्या माझ्या दिशेने जशा गोष्टी येत आहेत, तसा मी त्या स्वीकारत आहे. खूप पुढचा विचार करणं माझ्यासाठी योग्य नसेल. सध्या, माझं लक्ष चांगलं खेळण्यावर आणि योग्य मानसिकता राखण्यावर आहे. मी २०२७ च्या विश्वचषकात खेळेन की नाही हे आताच सांगू शकत नाही. सध्या अशी विधानं करण्यात काही अर्थ नाही. वास्तववादी दृष्टिकोनातून, मी नेहमीच माझ्या कारकिर्दीत एक-एक पाऊल टाकले आहे,”
रोहित पुढे म्हणाला, “मला भविष्याबाबत जास्त विचार करायला आवडत नाही आणि मी भूतकाळातही असं कधी केलं नाही. सध्या तरी मी माझ्या क्रिकेटचा आणि या संघाबरोबर घालवलेल्या वेळेचा आनंद घेत आहे. मला आशा आहे की माझ्या सहकाऱ्यांनाही माझी उपस्थिती आवडत असेल. सध्याच्या घडीला तेवढंच महत्त्वाचं आहे,” असे तो पुढे म्हणाला.
रोहितच्या या एका विधानाने चाहते नक्कीच संभ्रमात आहेत. पुढील विश्वचषक जवळपास अडीच वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकप जिंकावा ही रोहित शर्माची इच्छा आहे. पण २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही भारताला हे जेतेपद पटकावता आले नव्हते.