महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची मजूरी थकली असून केलेल्या कामाचे पैसे वेळेवर मजुरांच्या खात्यात जमा होत नसल्याने शासनाची ही योजना उधारीवरील योजना बनत चालली आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी हे भाग आदिवासी बहुत भाग असून येथे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व गावातच हातांना काम देण्याबरोबरच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत गांडूळखत, वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर अशा १४ प्रकारच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. त्याच बरोबर ग्राम विकासाची कामे देखील रोजगार हमी योजनेतून केली जातात. मात्र हे देखील पैसे शासनाकडून थकले असल्याने लाभार्थ्यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
जर रोजगार हमी योजनेचे पैसे वेळ मिळत नसतील तर मजुरांनी करायचे काय आणि खायचे काय असा प्रश्न निर्माण होत असून शासनाने रोजगार हमी योजनेकडे लक्ष देऊन मजुरांची मजुरी त्यांना वेळेवर मिळावी याची उपायोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली असून जर रोजगार हमी योजना अशीच चालू राहिली तर पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कमी चाललेले स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आदिवासी कुटंबतील लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि कुपोषणाचा प्रश्न देखील डोके वर काढू शकतो, त्यामुळे शासनाने प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघण्याची नितांत निर्माण झाली आहे.
पैशाअभावी संसाराचा गाडा हाकायचा कसा
रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची मजुरी काम केल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यावर श-षी प्रणालीव्दारे किंवा पोस्ट खात्यात जमा करायला हवी. अन्यथा ०.०५% विलंब आकारणी देय होते. १५ दिवसांच्या आतमध्ये कधीही मजुरांना मजुरी मिळताना दिसत नाही. रोजगार हमी योजनेमध्ये रोजगार सेवकाची भूमिका महत्वाची आहे. ग्राम रोजगार सेवक हे ग्रामपंचायतीला ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करण्यास मदत करतात. मात्र रोजगार सेवकांना देखील मागील पाच महिन्यांपासून वेतन्य मिळाल्यामुळे विक्रमगड तालुक्यातील जवळपास ८५ रोजगार सेवकांची परिस्थिती हालाकीची झाली असून पैशाअभावी संसाराचा काढा कसा हाकावा, आम्हाला शासनाने तत्काळ पगार द्यावा अशी मागणी रोजगार सेवकांकडून होत आहे.