पालघर-योगेश चांदेकर
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
खासगी व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांचे दणाणले धाबे
पालघरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सदानंद येगारे व विजय वाघमारे याची ठेकेदारी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्याकडून शालेय साहित्य व कपडे खरेदी करावेत, अशा सूचना शिक्षण विभगानेच दिल्याची चर्चा असून त्यामुळे येगारे व वाघमारे याच्याविरुद्ध कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. डहाणू पंचायत समितीचे प्रशासन याबाबत ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतल्याने आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनीच चौकशीचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना अन्य व्यवसाय करता येत नाहीत. त्यात शिक्षकांवर तर मोठी जबाबदारी असते. शिक्षक जरी थेट सरकारी कर्मचारी नसला, तरी राज्य सरकारच्या अनुदानातून त्याचा पगार जिल्हा परिषद किंवा अन्य संस्था करत असतात. त्यामुळे शिक्षकाला शिकवण्याव्यतिरिक्त अन्य काम करता येत नाही; परंतु बहुतांश शिक्षक विमा पॉलिसी, रिअल इस्टेटसह स्टेशनरी कपड्याची दुकाने असे अन्य व्यवसाय करत असून प्रशासन याकडे डोळेझाक का करते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नियमबाह्य खरेदी
विशेषतः ज्या शाळांमध्ये आपण शिकवतो, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, गणवेश, बूट आदींचा पुरवठा संबंधित शिक्षकाला करण्याचा अधिकार नाही किंवा त्याच्याकडून अशी खरेदी करणे नियमबाह्य आहे. असे असताना गेल्या दहा वर्षांपासून डहाणू तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सदानंद येगारे, तसेच विजय वाघमारे हे वेगवेगळ्या प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांचे गणवेश, अन्य शालेय साहित्य, बूट मोजे पुरवत आहे. त्यांची ही ठेकेदारी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून शाळांनी आपल्याकडूनच खरेदी करावी, यासाठी गणवेशामागे काही रक्कम ते संबंधित शाळांच्या प्रमुखांना देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अन्य कोणत्याही दुकानदाराकडून खरेदी करण्याऐवजी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचना डावलून शाळा येगारे व वाघमारे यांच्याकडून खरेदी करत होते. त्यातून शाळांसाठी साहित्य खरेदी करणारे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक तसेच येगारे आणि वाघमारे यांचाही फायदा होत होता.
दुकान आणि शिलाई कोठून याचाही शोध आवश्यक
डहाणू तालुक्यातील निकणे या केंद्रात पूर्वी येगारे शिक्षक होते, त्या केंद्रातील बहुतांश शाळांना तो शैक्षणिक साहित्य पुरवत होता. डहाणू तालुक्यातील सायवन,बांधघर, गंजाड, निकणे अशा सुमारे पन्नास टक्के शाळांमध्ये एकट्या येगारे याचे साहित्य जात होते. ज्याच्याकडून शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करीत होत्या, त्याचे दुकान कोठे आहे, याची चौकशी शाळांनी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. पूर्वी गणवेश शिवून घेतले जात. त्यासाठीचे कपडे कोठून घेतले जात होते, त्याची शिलाई कोठे केली गेली, याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
शिक्षण विभागाचे हितसंबंध?
डहाणू तालुक्यात गेली दहा वर्ष एक शिक्षक अशा प्रकारे लाखो रुपयांचा व्यवसाय करत असताना आणि हे सर्वांना माहीत असतानाही गटशिक्षणाधिकारी मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई का करत नव्हते, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरा शिक्षकही तीन-चार वर्षांपासून असा व्यवसाय करीत आहे. येगारे आणि वाघमारे यांचे पंचायत समितीत काही आर्थिक हितसंबंध आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मालमत्तेच्या चौकशीची गरज
सरकारी कर्मचाऱ्यांना ज्ञात उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून बेकायदेशीर मार्गाने काही उत्पन्न मिळत असेल, तर त्याच्या मालमत्तेची चौकशी केली जात असते. येगारे याच्याकडे पाच टक्के व्याजाने देण्यासाठी पैसे आले कुठून, त्याची कमाई किती, त्याचे उत्पन्न किती आणि त्याची गुंतवणूक किती, याची आता प्राप्तिकर खात्याने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दस्तावेज ताब्यात घेण्याची गरज
जिल्हा परिषदेने गेल्या दहा वर्षांतील शाळांनी केलेली गणवेश, साहित्य खरेदी त्याची बिले आणि यापूर्वीच्या लेखापरीक्षण अहवालात यासंबंधी मारलेले ताशेरे याची तपासणी केली, तर त्यातील मोठे गैरव्यवहार, अनियमितता उघडकीस येईल. यापूर्वी शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे करणाऱ्या एका शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. त्या शिक्षकांपेक्षाही येगारे, व वाघमारे याचे कारनामे आणखी गंभीर आहेत.
समितीच्या चौकशीकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येगारे आणि वाघमारे यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती कशी, कधी आणि किती काळात चौकशी करते आणि पूर्वीच्या एका प्रकरणात शिक्षकाला जसे निलंबित केले होते, तसे निलंबित करते का, पाठीशी घालते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.